Published On : Fri, Oct 22nd, 2021

– प्यार फाऊंडेशनद्वारे ८७२ भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण

Advertisement

– प्यार फाऊंडेशनद्वारे ८७२ भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण

चंद्रपूर : शहरातील भटक्या व मोकाट कुत्रांचा नागरिकांना होणारा त्रास आणि कुत्र्यांची वाढती संख्या प्रतिबंधित करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून मोहीम राबिण्यात येत आहे. त्याअंतर्गत दिनांक २१ ऑक्टोबरपर्यंत एकूण ३५१ भटक्या कुत्र्यांची मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे तैनात फिरत्या पथकाद्वारे जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये १८३ नर व १६८ मादी कुत्र्यांचा समावेश आहे.

तर चंद्रपूर व आसपासच्या भागातील भटक्या कुत्र्यांना प्यार फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या चमूने १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ८७२ भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस दिली.

शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याचे चित्र विविध भागांत पाहायला मिळत आहे. कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे असते. ॲनिमल बर्थ कंट्रोल रुलच्या (डॉग्स) नुसार अँटी रेबीज प्रोग्रॅमअंतर्गत चंद्रपूर शहरातील सर्व भटक्या व मोकाट गावठी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्यासोबतच त्यांची जन्मदर नियंत्रण शस्त्रक्रिया करण्याची मोहीम देखील राबविण्यात येत आहे.

यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने फिरते पथक तैनात करण्यात आलेले आहे. आपल्या आसपासच्या परिसरात अशी मोकाट कुत्री आढळल्यास नागरिकांनी स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंदरे (7028882889) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.