Published On : Mon, Mar 4th, 2019

जैव इंधन देशाच्या भविष्याची गरज : ना. गडकरी

नागपूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने सीएनजी बस सेवेचे लोकार्पण

Advertisement

नागपूर: दैनंदिन विकसित होत जाणाऱ्या तंत्रज्ञानासोबतच आज दररोज प्रदुषणाची समस्या वाढत आहे. जल व वायू प्रदूषण ही मोठी समस्या आहे. आपले नागपूर शहर स्वच्छ व सुंदर होत असतानाच ते प्रदूषणविरहित शहर व्हावे यासाठी महानगरपालिकेने जैव इंधनाची धरलेली कास ही पथदर्शी आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाहनांनी दररोज होणारे प्रदूषण व त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर पडणारा प्रभाव यापासून कायमची सुटका करण्यासाठी आज जैव इंधन अत्यंत आवश्यक ठरते. येणारा काळ जैव इंधनाचाच असून जैव इंधन ही देशाच्या भविष्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाज बांधणी, जलस्त्रोत मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Advertisement

नागपूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने मनपाने प्रदूषणरहित नागपूरच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकलेले आहे. त्या अंतर्गत सीएनजी बस सेवेचे शनिवारी (ता. २) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, परिवहन समिती सदस्या अर्चना पाठक, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, रेखा साकोरे, सदस्य सुनील हिरणवार, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते.

Advertisement

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, विविध अभिनव पथदर्शी प्रयोग देणारे शहर म्हणून आज देशात आपल्या नागपूर शहराचे नाव गौरवाने घेतले जाते. शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असतानाच स्वच्छ व सुंदर नागपूर ही संकल्पनाही सर्वत्र साकारत आहे. इलेक्ट्रिक, सीएनजी, मिथेनॉल ही जैविक इंधने देशाचे भविष्य आहेत. याची जाण ठेवित प्रदूषणाच्या समस्येवर मात करून आर्थिक बचतीच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने परिवहन सेवेमध्ये सीएनजी बसचा समावेश करणे ही अभिमानास्पद बाब आहे. आजघडीला डिझेल ६५ रुपये प्रति लिटर तर सीएनजी ५५ रुपये प्रति लिटर आहे. मात्र एक लिटर डिझेलमध्ये केवळ २.७ किमी अंतर पार करता येते तर सीएनजीमुळे एका लिटरमध्ये ४.२ किमी अंतर पूर्ण करता येते. त्यामुळे पर्यावरणपूरकसह आर्थिकदृष्ट्याही सीएनजी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यापुढे पुन्हा एक पाऊल पुढे टाकीत मनपामध्ये सेवेत असलेली सर्व वाहने सीएनजीमध्ये परिवर्तीत करुन देशातील पहिली महानगरपालिका म्हणून पुन्हा एक बिरूद नागपूरला लावण्याचे आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

येत्या काळात धानाची तणस व मटन, मच्छी आणि फळांच्या टाकाऊ घटकांपासून जैव इंधन निर्मिती करण्यात येणार आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तणसापासून बायो सीएनजी प्रकल्प साकारण्याचा मानस आहे. या प्रकल्पामुळे चारही जिल्ह्यातील हजारो तरूणांना रोजगार मिळेलच शिवाय येथील नागरिकांना ट्रॅक, ट्रॅक्टर अशी वाहने अत्यंत कमी दरात चालविता येणार आहे. या प्रकल्पातून रोजगासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेली जैव इंधन बस व त्याचा उपयोग मनपामधील सेवा देणा-या वाहनांसाठी करून त्याची योग्य अंमलबजावणी केल्यास येणाऱ्या काळात देशातील सर्वात सुंदर व प्रदुषणमुक्त शहर म्हणून नागपूर शहर पुढे येईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले तर आभार परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी मानले.

मनपाची वाहने होणार सीएनसी : महापौर नंदा जिचकार
आपले स्वच्छ व सुंदर नागपूर शहर प्रदुषणमुक्त शहर व्हावे यासाठी नागपूर महानगरपालिकेतील परिवहन बसेससह मनपामधील सर्व वाहने सीएनजी करण्यात येईल. या श्रृंखलेमध्ये महापौरांचे वाहन सर्वप्रथम सीएनजी केले जाईल, अशी घोषणा महापौर नंदा जिचकार यांनी दिली. जैव इंधनाच्या वापरात पुढचे पाऊल म्हणून नागपूर महानगरपालिकेची सर्व वाहने सीएनजी करण्याच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनावर महापौरांनी तात्काळ दखल घेतली.

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोफत प्रवास : जितेंद्र कुकडे
प्रास्ताविकामध्ये परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी सीएनजी बस सेवेचे महत्त्व सांगितले. मनपाच्या इतरही बसेस सीएनजीमध्ये लवकरच परिवर्तीत करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला ‘रॉ मॅट’चे संपूर्ण सहकार्य आहे. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवा देणाऱ्या बसमध्ये शहीद जवानांचे कुंटुंबिय व दिव्यांग व्यक्तींना संपूर्ण प्रवास मोफत दिला जाणार असल्याचेही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement