नागपूर:मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप लोकांचा बळी गेला. या भ्याड कृत्याची जबाबदारी काही दहशतवादी संघटनांनी घेतली असली, तरी भारताने थेट पाकिस्तानलाच दोषी धरलं आहे.
या घटनेनंतर अवघ्या 24 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘सुरक्षा समिती’ची (CCS) तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्तानविरोधात पाच ठोस आणि तीव्र निर्णय घेतले. भारताचा हा केवळ निषेध नव्हे तर थेट कृतीचा इशारा होता – आणि जगालाही हे स्पष्टपणे दाखवून दिलं की, भारत आता गप्प बसणार नाही.
या महत्त्वाच्या बैठकीत भारताने अशी राजनैतिक कारवाई केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई गोळी न झाडता झाली असूनही परिणाम अत्यंत गंभीर ठरू शकतात. चला पाहूया, हे निर्णय कोणते होते आणि त्याचा पाकिस्तानवर कसा परिणाम होऊ शकतो.
सिंधू पाणी करार संपुष्टात-
भारताने सर्वात मोठं पाऊल उचलत 60 वर्षांपासून चालत आलेला सिंधू पाणी वाटप करार थांबवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील सुमारे 80% शेती ही सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांवर आधारित आहे. या पाण्यावर ऊर्जा निर्मितीसाठीही अनेक प्रकल्प आहेत. जर भारताने हे पाणी रोखलं, तर पाकिस्तानमध्ये गंभीर जलसंकट आणि वीजटंचाई निर्माण होऊ शकते.
अटारी बॉर्डरवरील हालचाली थांबवण्यात आल्या-
दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे अटारी सीमारेषेवरील पोस्ट बंद करण्यात आली आहे. अधिकृत व्यापार आधीच थांबला होता, पण छोट्या व्यापाऱ्यांच्या पातळीवर अजूनही काही वस्तूंची देवाणघेवाण सुरू होती. आता ती संपूर्णपणे बंद झाली असून, याचा आर्थिक फटका थेट पाक व्यापाऱ्यांना बसणार आहे.
सार्क व्हिसा योजना रद्द – पाक नागरिकांना भारतात प्रवेशबंदी-
तिसऱ्या निर्णयात भारताने सार्क अंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना मिळणारी व्हिसा सवलत रद्द केली आहे. वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे भारतात येणाऱ्यांनाही यापुढे प्रवेश मिळणार नाही. यामुळे मानवी संबंधही तुटतील. त्याचबरोबर भारतात असलेल्या पाक नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश-
दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील लष्कर, नौदल आणि हवाई दलाशी संबंधित सल्लागारांना भारत सोडण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतानेही इस्लामाबादमधून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये कोणतीही शासकीय चर्चा पुढे होणे शक्य नाही.
संपूर्ण संबंध तोडण्याच्या दिशेने भारताचा निर्धार-
पाकिस्तानशी आता सर्व प्रकारचे संबंध , व्यापार, संवाद, आणि परस्पर भेटी, थांबवण्याचा स्पष्ट निर्णय भारताने घेतला आहे. यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक एकटा पडेल. पहलगाममध्ये शहीद झालेल्यांचा सूड आता राजनैतिक शस्त्रांनी घेतला जात आहे.