सावनेर: सावनेर तालुक्यातील पिपळा ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात असताना बनावट गावठाण प्रमाणपत्रे व कर पावत्यांद्वारे सुमारे १२७ भूखंडांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी धर्मेंद्र बन्सोड, सरपंच विष्णू कोकडे आणि दोन लेआउट धारकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
चौकशीतून उघड झाले की, अधिकाऱ्यांनी अधिकारात नसताना गावठाण प्रमाणपत्रे व कर पावत्या बनवल्या. या कागदपत्रांचा ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये कुठेही उल्लेख नाही. यासंदर्भातील चौकशी समितीच्या अहवालात मोठ्या प्रमाणात अनियमितता स्पष्ट झाली आहे.
राजकीय दबावाखाली कार्यवाही केल्याची कबुली काही कर्मचाऱ्यांनी दिली असून, संबंधित रेकॉर्डही संशयास्पद रीतीने हाताळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खापरखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंदकुमार कटलाम तपास करत असून, या प्रकरणात आणखी बड्या नावांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.