Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Aug 18th, 2018

  आॅरेंज सिटीतील अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड

  नागपूर : आॅरेंज सिटीतील आघाडीचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी इतिहास घडवताना जगातील सर्वांत आव्हानात्मक रेसपैकी एक असलेली रशियातील रेड बुल्स ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम (९१०० किलोमीटर) शुक्रवारी पूर्ण करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारे डॉ. समर्थ हे भारतातील पहिले सायकलपटू ठरले.

  मॉस्को येथे २४ जुलै रोजी फ्लॅग आॅफ झालेल्या या रेसचे २५ दिवसात १५ टप्पे पूर्ण करायचे आव्हान होते. अखेर चारच सायकलपटूंनी शुक्रवारी व्लादिवस्तक ‘फिनिशिंग पॉर्इंट’ गाठला. पीटर बिश्चॉपने ३१५ तास ४५ मिनिट २८ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण करीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर मायकल कनूडसेन (३३३.१३.०४), मार्सिलो फ्लोनटिनो सोरेस (३४६.१९.००) आणि अमित समर्थ (३४७.१६.१७) यांचा क्रमांक येतो. डॉ. समर्थ यांनी निर्धारित वेळेत नियोजित टप्पा गाठल्यानंतर रेड बुल्स संघाने जल्लोष करण्यास प्रारंभ केला.

  यापूर्वी, गेल्या वर्षी रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका (आरएएएम) ११ दिवस २१ तास आणि ११ मिनिट वेळेत पूर्ण केल्यापासून डॉ. अमित समर्थ चर्चेत आले होते. पाच हजार किलोमीटर अंतराची ही शर्यत समुद्र किनाऱ्यावरुन कॅलिफोर्निया ते अ‍ॅनापोलिश, मॅरीलँड या मार्गावर झाली होती. ही शर्यत पूर्ण करणारे डॉ. समर्थ पहिले भारतीय ठरले. तेवढ्यावर न थांबता त्यांनी रशियातील खडतर शर्यत पूर्ण करण्याचा चंग बांधला होता. अखेर अथक परिश्रम घेत त्यांनी आज खडतर रेस पूर्ण केली. अमित यांनी बुधवारी ६९० किलोमीटर अंतराचा १४ वा टप्पा पूर्ण केला होता. १५ वा म्हणजेच ७०० किमी अंतराचा निर्णायक टप्पा शुक्रवारी गाठत त्यांनी ऐतिहासिक पराक्रम केला.

  डॉ. समर्थ यांची कामगिरी
  रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका (पाच हजार किलोमीटर अंतर) ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्या प्रयत्नात पूर्ण करण्याचा पराक्रम.
  आयर्न मॅन आणि रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका पूर्ण करणारे एकमेव भारतीय

  इन्स्पायर इंडियातर्फे आयोजित डेक्कन क्लिफहँगर २०१७ (पुणे ते गोवा ६४३ किलोमीटर अंतर) रेस २५ तास २८ मिनिट वेळेत पूर्ण करीत जेतेपदाला गवसणी

  बुसेलटोन (आॅस्ट्रेलिया) येथे ४ डिसेंबर २०१६ रोजी ११ तास ५४ मिनिट वेळेत (३.८ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे) रेस पूर्ण करीत पूर्ण आयर्नमॅनचा किताब.

  ११ वेळा आयर्नमॅन ७०.३ रेस फिनिश करण्याची कामगिरी. ३० ते ३९ वयोगटात ७०.३ आयर्नमॅन विभागात अव्वल मानांकित अ‍ॅथ्लिट.
  पुन्हा सहभागी होण्यास उत्सुक : अमित

  रेसबाबतचा अनुभव सांगताना डॉ. समर्थ म्हणाले,‘ही खडतर रेस आहे. पहिले १० टप्पे ५ हजार किलोमीटर अंतराचे आणि त्यानंतरचे पाच टप्पे ४ हजार किलोमीटरचे होते. १० टप्प्यानंतर ही रेस आणखी खडतर झाली. किंग्स स्टेजनंतर मी थकलो होतो, पण आत्मविश्वास कायम होता.’ वातावरण आणि मार्गाबाबत बोलताना समर्थ म्हणाले,‘मार्ग खडतर होता. तिथे सर्व प्रकारच्या टेकड्या होत्या आणि मार्ग चढउताराचा होता.

  या व्यतिरिक्त रेसदरम्यान आव्हानात्मक वातावरणाला सामोरे जावे लागले. त्यात पाऊस, थंडी, धुके आणि अनेक ठिकाणी सकाळी व सायंकाळी शून्य डिग्री तापमानामध्ये मार्गक्रमण करावे लागले.’ आरएएएमच्या तुलनेत ही शर्यत खडतर असल्याचे सांगताना समर्थ म्हणाले,‘९ हजार किलोमीटरचा टप्पा खडतर होता. आरएएएम रेसच्या तुलनेत हा टप्पा आव्हानात्मक होता. पूर्ण २५ दिवस तुम्हाला मार्गावर प्रवास करावा लागतो.

  पहिल्या १० टप्प्यानंतर रेस अधिक आव्हानात्मक होते.’ समर्थ पुढे म्हणाले,‘आव्हानात्मक वातावरणात मी जवळजवळ सायकलने १० माऊंट एव्हरेस्ट शिखरे चढण्याची कामगिरी केली. भविष्यात माझ्याकडून पुन्हा ही रेस पूर्ण होईल किंवा नाही, याची कल्पना नाही. कदाचित दोन-तीन वर्षांनंतर मी पुन्हा ही रेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करील.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145