
नागपूर – महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यंदा उन्हाळी सुट्ट्या आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत राज्यभर एकसमान धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांच्या वेळापत्रकाबाबतची अनिश्चितता दूर होणार आहे.
शिक्षण संचालनालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य मंडळाशी संलग्न सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ठराविक कालावधीची सुट्टी मिळणार असून पालकांनाही नियोजन करणे सोपे होणार आहे.
यंदा आणखी एक मोठा बदल करत शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यातील शाळा १५ जूनपासून एकाच दिवशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी विदर्भात उष्णतेमुळे शाळा उशिरा सुरू होत असत, मात्र आता सर्व विभागांसाठी एकसमान वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. यामुळे शैक्षणिक सत्राचे नियोजन अधिक सुसंगत होईल, असा विभागाचा विश्वास आहे.
दरम्यान, जून महिन्यातील वाढत्या तापमानाचा विचार करून १५ जून ते २९ जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या काळात शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत चालणार आहेत. त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळापत्रकानुसार शाळा सुरू होतील.
या संदर्भातील सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.









