
नवी दिल्ली – देशातील बदलत्या सामाजिक वास्तवाला लक्षात घेऊन केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी जनगणनेत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची नोंद ‘विवाहित’ या श्रेणीत करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या बदलामुळे देशातील कौटुंबिक आकडेवारीत नवे चित्र दिसण्याची शक्यता आहे.
२०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तयार करण्यात येत असलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हा बदल सुचवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत केवळ कायदेशीर विवाह झालेल्यांनाच ‘विवाहित’ म्हणून नोंदवले जात होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीचा विचार करून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांनाही या गटात समाविष्ट करण्याचा विचार केला जात आहे.
या निर्णयामागे सामाजिक सुरक्षेचा दृष्टिकोन महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः महिलां व मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना अधिकृत ओळख मिळावी, यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरू शकतो, असे मत व्यक्त होत आहे.
याशिवाय, देशात लिव्ह-इन रिलेशनशिपचे प्रमाण वाढत असल्याने त्याची अचूक नोंद ठेवणेही सरकारसाठी आवश्यक ठरत आहे. त्यामुळे कुटुंबरचनेचे अधिक वास्तव चित्र सरकारसमोर येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, २०२७ ची जनगणना मोठ्या प्रमाणात डिजिटल पद्धतीने पार पडण्याची शक्यता असून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन स्वरूपात नोंदवण्याची सुविधा दिली जाऊ शकते.









