
राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार असून, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच पक्षांची धावपळ वाढली आहे. या शेवटच्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याचा थेट फायदा महायुतीला झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे.
नागपुरात तर ही बाब अधिक ठळकपणे समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 21 मधील अधिकृत उमेदवार गौरव महाजन यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतकेच नव्हे, तर त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजय दलाल यांना जाहीर पाठिंबा दिला. गौरव महाजन यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने नागपुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
दरम्यान, जळगावमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. ठाकरे गटाच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आणि तेथे बिनविरोध विजयाची नोंद झाली.
राज्यातील विविध महापालिकांमध्ये अपक्ष तसेच महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या माघारीमुळे महायुतीला मोठा फायदा झाला आहे. आतापर्यंत महायुतीचे तब्बल 57 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली असून, हा महाविकास आघाडीसाठी गंभीर धक्का मानला जात आहे.








