
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत सुमारे १ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचे मेथिलीनडायऑक्सी मेथॅम्फेटामाईन (एमडी) पावडर जप्त केली आहे. या प्रकरणी ५१ वर्षीय संशयिताला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली.
१३ फेब्रुवारीच्या रात्री सुमारे ११.१० वाजताच्या सुमारास पथक गणेशपेठ परिसरात गस्त घालत असताना अभ्यंकर भवन, सुभाष रोड, राजाराम देवी चौक परिसरात एक व्यक्ती एमडीची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवर आलेल्या संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव संजय रामप्रसाद गंगवानी (वय ५१, रा. गणेशपेठ, नागपूर) असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्या दुचाकीच्या डिकीतून ५१२ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारमूल्यानुसार या अमली पदार्थाची किंमत सुमारे १,०२,४०,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इंदूर कनेक्शन उघड-
चौकशीत आरोपीने हा साठा मध्य प्रदेशातील इंदूर येथील फरार साथीदाराने खासगी प्रवासी वाहतूक कुरिअरमार्फत पाठविल्याचे कबूल केले. आरोपीकडून एमडी पावडरव्यतिरिक्त तीन मोबाईल फोन, एक हेल्मेट आणि ४१ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १,०३,८२,००० रुपये आहे.
आरोपी अमली पदार्थ विक्री करून आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू
या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यान्वये कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. इंदूर येथील फरार आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास केला जात आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, संयुक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, उपायुक्त (शोध) राहुल मकनिकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.








