साइकल फॉर चेंज चॅलेंज सात दिवस राबविणार
शहरातील विविध संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन
नागपूर : नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने जागतिक सायकल दिनानिमित्त शुक्रवार, ३ जून २०२२ रोजी “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज-२” अंतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘सायकल राईड’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी नागपूर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे.
सदर सायकल रॅली सकाळी 7 वाजता दीक्षाभूमी येथून सुरु होऊन लक्ष्मीनगर चौक-माटे चौक-अंबाझरी तलाव-एलएडी चौक-व्हीएनआयटी गेट-बजाज नगर-काचीपुरा चौक-नागपूर मेट्रो ऑफिस या मार्गाने मार्गक्रमण करीत दीक्षाभूमी येथे सांगता करण्यात येईल. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२२ रोजी स्मार्ट सिटीतर्फे पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येईल. ६ जून २०२२ रोजी ‘हैप्पी स्ट्रीट पॉलिसी’वर स्टेकहोल्डर्स सोबत चर्चा करण्यात येणार आहे तर ८ जून २०२२ रोजी सायकलला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन सत्राच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज-१” या उपक्रमात नागपूर स्मार्ट सिटीने याआधी भाग घेऊन एक कोटी रुपयाचा पुरस्कार पटकावला आहे. आता पर्यावरणपूरक वाहतूक, ई-बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज-२” उपक्रमाअंतर्गत नागपूर स्मार्ट सिटी तर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंमलबजावणी संस्था, रस्ता मालकीचे प्राधिकरण, सहाय्यक कलाकार संस्था, महा मेट्रो, स्वयंसेवी संस्था तसेच शहरातील सायकलींग समूहांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे.