Published On : Fri, Feb 18th, 2022
By Nagpur Today Nagpur News

भारतातील पहिल्या डबल डेकर जलकुंभाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दक्षिण नागपूरमध्ये नव्याने विकसित झालेल्या व जलवाहिण्या नसलेल्या भागांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ३४ मध्ये मेहरबाबा नगर चिखली(खुर्द) येथे भारतातील पहिल्या डबल डेकर जलकुंभाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १७) झाले.

यावेळी मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) झलके, नगरसेवक नागेश मानकर, नगरसेविका माधुरी ठाकरे, नगरसेविका मंगला खेकरे, मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर देशातील सर्वांगसुंदर शहर : नितीन गडकरी
नागपूर शहर हे भारतातील सर्वात सुंदर शहर बनत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरात सर्व क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. शहरात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यासारख्या विविध क्षेत्राचा विकास करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागपूर देशातील सर्वांगसुंदर शहर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

पुढे ते म्हणाले, डबल डेकर उड्डाण पुलाच्या धर्तीवर डबल डेकर जलकुंभाची संकल्पना पुढे आली. कमी जागेत जागेत जास्त पाणी साठवून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. शहराला पुढील २५ वर्ष पाण्याची समस्या येणार नाही अशी व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मागील १० वर्षात पाण्याच्या समस्येसाठी कुणीही मोर्चा काढलेला नाही. नागपूर देशातील पहिले शहर आहे जिथे २४/७ पाण्याची योजना सुरू आहे. नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय नागपूरच्या जनतेला जात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी महापौर दयाशंकर तिवारी यांचे कौतुक करत म्हणाले, नागपूर शहराला आतापर्यंतचे सर्वात प्रतिभावंत महापौर लाभले आहे. दयाशंकर तिवारी यांनी एक वर्षात नागपूर शहराचा सर्वांगीण विकास केला. प्रत्येक क्षेत्रात विकास करण्यासाठी नवीन योजना आखून नागपूरला सुंदर शहर बनवले.

१२ महिन्यात १२ पाण्याच्या टाक्यांची निर्मिती : महापौर
नागपूर शहरातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने शहरात १२ महिन्यात १२ पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू केले. वर्षभरात शहरात १३० किमीची पाईपलाईन टाकण्यात आली. सोबतच १८ हजार नवीन घरांना नळाचे कनेक्शन देण्यात आले. यामुळे शहरातील पाण्याची समस्या नक्कीच सुटेल, असा विश्वास यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महानगरपालिकेने भारतातील पहिल्या डबल डेकर जलकुंभाचे भूमिपूजन करून नागपूर शहराने एक नवीन इतिहास घडविला आहे. यावेळी महापौरांनी मनपातर्फे सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. नितीन गडकरी हे आधुनिक भारताचे विश्वकर्मा आहेत, आशा शब्दात महापौरांनी यावेळी नितीन गडकरी यांचे कौतुक केले.

यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय (पिंटू) झलके यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात डबल डेकर जलकुंभाविषयी माहिती दिली. आमदार मोहन मते यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रवीण ठाकरे यांनी तर आभार स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी मानले.

असा होणार पाणीपुरवठा
खालच्या कंटेनरमधून – महाकाली नगर, विणकर कॉलनी, गुरूकुंज नगर, गिता नगर, आकाशनगर, शाहू नगर कल्पतरू नगर.
वरच्या कंटेनरमधून – विठ्ठल नगर, वैष्णवमाता नगर, उदयनगर, अमर नगर, सिध्देश्वर नगर, चक्रपाणी नगर.


जलकुंभाचे ठळक वैशिष्ट्ये :
· देशात प्रथमच डबल डेकर जलकुंभाची निर्मिती.
· या कामावर होणारा एकूण खर्च रू. १४.४५ कोटी.
· या जलकुंभाचे एकुण दोन कंटेनर आहेत.
· जमिनीपासून खालच्या (Bottom) कंटेनरची उंची – २१.५ मीटर.
· जमिनीपासून वरच्या (Top) कंटेनरची उंची – ३१.०० मीटर.
· मुख्य जलवाहिनी (Feeder Main)
आकार- ६०० मी.मी. DI K9
एकूण लांबी १६०० मीटर
· मुख्य जलवाहिनी ही तपस्या विद्यालय, रिंग रोड येथे अस्तित्वात असलेल्या ६०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीस जोडण्यात येईल.
· उक्त दोन्ही जलकुंभाची क्षमता 20 लक्ष लिटर + 20 लक्ष लिटर आहे.

सदर कामाचा कार्यादेश २४ जानेवारी २०२२ रोजी देण्यात आला असून येथील मातीपरीक्षण करण्यात आले आहे. तसेच कामाचे डिझाईन, ड्रॉईंग तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement