Published On : Sun, Feb 7th, 2021

पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

Advertisement

नागपूर: पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आज शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. नागपूर सुधार प्रन्यास यांच्या अधिनस्त असणाऱ्या नागरी दलित वस्ती सुधार योजना 2019-2020 अंतर्गत मौजा इंदोरा येथील डिप्रेस क्लास ऑफ हाऊसिंग सोसायटीमध्ये सीवर लाईन टाकण्याचे कामाचे भूमिपूजन श्री. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. ही सीवर लाईन जवळपास 350 मीटर लांबीची राहणार असून यासाठी 8.8 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.

नागरी दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत मौजा इंदोरा, मायानगर येथील बुध्दमुर्तीच्या बाजूला विपश्यना केंद्र तसेच वाचनालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. येथील 400 चौरस फुट जागेवर वाचनालाची दुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच या योजनेतंर्गत मौजा नारी येथील दरवाडे लेआऊट येथे रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्याची 500 मीटर तर रुंदी 9 मीटर राहणार आहे. या कामासाठी जवळपास 21 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या भागामध्ये गरजेप्रमाणे विजेचे खांब बसवून पथदिवे लावण्यात येतील, असे आश्वासन श्री. राऊत यांनी यावेळी दिले.

उत्तर नागपूर, मौजा नारी येथील दलित्तेरर वस्ती सुधार योजनेतंर्गत आर्यनगरमधील गटर लाईन टाकण्याचे काम, येथील इंडो जपान शाळेच्या मागे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम, मौजा नारा येथील एकता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीतील रस्त्याचे बांधकाम तसेच मौजा इंदोरा येथील कस्तुरबानगर येथे रस्ता क्रमांक तीनचे डांबरीकरण यासह विविध विकास कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.