| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, May 5th, 2017

  ‘कवडस’च्या जलशुद्धीकरण सयंत्र प्रकल्पाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन


  नागपूर
  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या ‘कवडस’ गावाला आज अमृता फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जलयुक्त अभियानातंर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन करून लोकार्पण केले.

  यावेळी तहसिलदार (हिंगणा) प्रमोद वाघमारे, गट विकास अधिकारी महेंद्र जुवारे, संजय वानखेडे, हिंगणा तालुका कृषी अधिकारी संजय भगत, जिल्हा परिषद सदस्या वंदना पाल, पंचायत समिती सदस्य राजेंद्र वाघ, कवडस ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा गावंडे, सचिव एस.एन. पाटील, ‘राईट वॉटर सोल्युशन’चे व्यवस्थापक अभिजीत गान, परनॉड रिकार्ड, इंडिया लिमिटेडचे महाप्रबंधक प्रसन्न मोहिले, निरामय बहुद्देशीय सेवा संस्थेच्या उर्मिला क्षीरसागर तसेच गावकरी उपस्थित होते.

  कृषी विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान 2015-16 अंतर्गत कवडस ग्रामपंचायतमधील सिमेंट नाला बांधकाम खोलीकरण या विकास कामाचे अमृता फडणवीस यांनी कोनशिलेचे अनावरण केले.


  जलशुद्धीकरण सयंत्राद्वारे कवडस ग्रामवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. येथील पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे. ते आरोग्याला हानीकारक आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण सयंत्र प्रकल्प ‘कवडस’ वासियांकरिता अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पातंर्गत एका कुटुंबाला एक याप्रमाणे ‘वॉटर एटीएम कार्ड ’ देण्यात येईल. याद्वारे गावकरी गरजेनुसार ‘वॉटर एटीएम कार्ड’ चा वापर करून शुद्ध पाणी हव्या त्यावेळी वापरू शकेल. 20 लीटर पाण्यासाठी केवळ 5 रूपये असे नाममात्र दर लावण्यात येईल. या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी करता येईल.


  कवडसच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सुरादेवी, लोणखैरी, वारेगाव, कवठा, म्हसाळा आणि खैरी या गावांमध्ये जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात आले आहे. जलशुद्धीकरण सयंत्रामुळे या गावांना वेळेत शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध झाले. ग्रामवासियांना जलशुद्धीकरण सयंत्राचा होणारा फायदा लक्षात घेवून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यातील 100 गावांमध्ये जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण सयंत्र स्थापन केल्यामुळे गावकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145