भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड परिसरात चार मजली निवासी इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाची पथके ढिगारा हटविण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्याखाली एक लहान मुलगा अडकल्याची शक्यता असल्याने बचावकार्य अत्यंत सावधगिरीने सुरू आहे.
दरम्यान, दुर्घटनेनंतर परिसरात हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. समीन नावाचा तरुण सलूनमध्ये काम करत असून काही पैसे ठेवण्यासाठी इमारतीत गेला असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. त्याचा अद्याप शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून परिसरातील वातावरण भावूक झाले आहे.
प्रशासनाकडून ढिगारा पूर्णपणे हटवल्यानंतरच मृत आणि जखमींचा अंतिम आकडा स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बचावकार्य अद्यापही अखंड सुरू असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.





