Published On : Tue, Feb 18th, 2020

भीमा कोरेगाव किंवा एल्गार प्रकरणाची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही. तर पोलिस दलाचा ज्यापद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी व्हावी- शरद पवार

शरद पवारांनी साधला माध्यमांशी संवाद…

मुंबई : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा तपास NIA कडे दिला तो केंद्राचा अधिकार आहे. परंतु भीमा कोरेगाव किंवा एल्गार याची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही. तर पोलिस दलाचा ज्यापद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

या प्रकरणाचा चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारलाही आहे. यामध्ये पोलिस दलातील पुणे पोलिस यांनी जो तपास केला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

भीमा कोरेगाव, एल्गार परिषदेची चर्चा राज्यात सध्या जोरदार सुरु आहे. भीमा – कोरेगाव हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोकं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जावून आले आहेत. त्या काळात जे युद्द झालं. त्यावेळी पेशव्यांचा पराभव झाला होता. ब्रिटिशांच्या बाजुने काही घटक होते हे यावरुन स्पष्ट होते. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणार्‍या लोकांना पाण्याची व्यवस्था करत होती. त्यावेळी कोणतीही कटुता नव्हती. मात्र आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केलं. वडूज गावात छत्रपती संभाजी महाराजांचे रक्षण करणार्‍या व्यक्तीची समाधी होती.

आता भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी सुरु आहे. कमिशन नेमलं आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर येईल त्यावर आज भाष्य करता येणार नाही.

कोरेगाव आणि एल्गारचा संबंध नव्हता. पुरोगामी विचाराच्या लोकांनी सहभागी होत ही एल्गार परिषद घेतली होती. पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होणार होती परंतु प्रकृती मुळे ते आले नाहीत. त्या परिषदेत भाषणे झाली. पोलिस रिपोर्ट सादर केला गेला. त्यात सगळं सांगितले आहे.
आज प्रश्न निर्माण झाला आहे तो त्याच्याशी संबंध नसलेल्या लोकांचा आहे. त्याठिकाणी हजर नव्हते. त्यांच्यावर खटले भरण्यात आले आहेत.

सुधीर ढवळे यांनी कविता वाचन केले म्हणून त्यांना अटक केली. नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे वाचन केले होते. त्या कवितेत राज्यातील शहरात गावात उपेक्षित वर्गावर झालेले अत्याचार यावर तीव्र भावना व्यक्त केली होती.

शेवटी त्या कवितेत या शहरा शहराला आग लावत जा असा सारांश होता. नामदेव ढसाळ यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे या कवितेचा आधार घेऊन दोन – दोन वर्ष तुरुंगात टाकायचे ही गोष्ट योग्य नाही. यांच्यावरील अन्याय कसा दुर करता येईल. कोर्टात काय होतेय हे पाहणे आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टात त्यांना जामीन मिळाला नाही. जी माहिती राज्याने ठेवली. पुरावे असे तयार केले की जामीन त्यांना मिळाला नाही. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या दाखल्याचे वाचन शरद पवारांनी यावेळी केले. चौकशी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. आणि आमचीही तीच मागणी आहे. यामागे कोण आहे त्याची चौकशी व्हावी. त्यासाठी एसआयटी नेमा. चांगले अधिकारी घ्यावेत. जे काही पुरावे देण्यात आले त्यातील सत्य बाहेर येईल. शिवाय तुरुंगात का डांबले व ज्यांनी केलं आहे सत्य बाहेर येईल असेही शरद पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी बैठक घेतली. केंद्रसरकारने का तत्परता का दाखवली. केंद्र सरकारला याची माहिती कुणी दिली. यामध्ये अधिकारी कोण आहेत का याची माहिती चौकशीत पुढे येईल असेही शरद पवार म्हणाले.

या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. की साहित्यिकांना डांबले आहे. त्यांचे कार्य आक्रमक आहे म्हणून मी देशद्रोही म्हणणार नाही.

एल्गार परिषद झाल्यावर शपथ घेण्यात आली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्राम धाम पुणे यांनी रिपोर्ट दिला आहे. जी शपथ घेण्यात आली त्या शपथेचे वाचन शरद पवारांनी यावेळी केले. या शपथेमध्ये संविधानाचा उल्लेख आहे असं असताना तुरुंगात डांबले आहे. ते उपस्थित नव्हते त्यांनाही डांबले आहे. सत्तेचा कसा गैरवापर केला हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हे प्रकरण मला लोकांच्या समोर आणायचं आहे. राज्य सरकार काय तपास करायचा ते करेल मी त्यात पडणार नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

पोलिस दलाची अवस्था आज काय आहे. मात्र सत्तेचा गैरवापर पोलिसांना वापरुन होतो ही चिंताजनक बाब आहे. म्हणून मी हे प्रकरण मांडत आहे असेही शरद पवार म्हणाले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.