Published On : Thu, Nov 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

भंडाऱ्यात वाघाचा कहर; आई-वडिलांसमोरच पाच वर्षीय चिमुकल्याला २०० मीटर नेले फरफटत !

Advertisement

भंडारा : संपूर्ण परिसर दिवाळीच्या आनंदात न्हाऊन निघाला असताना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दोनाड गावात शेतात आई-वडिलांसोबत गेलेल्या अवघ्या पाच वर्षीय मोक्ष बुरडे याच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत वाघाने चिमुकल्याला पकडून तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. या हल्ल्यात मोक्षचा मृत्यू झाला. दिवाळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने बुरडे कुटुंबाचा आनंद क्षणात उद्ध्वस्त झाला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दोनाड येथील शेतकरी सचिन दयाराम बुरडे (४५) हे पत्नी सोनाली यांच्यासह गुरुवारी (५ नोव्हेंबर) शेतात धानाचा पुंजना करण्यासाठी गेले होते. पावसाळी धानाची कापणी झाल्यानंतर शेतातील काम सुरू होते. दिवाळीची सुट्टी असल्याने त्यांची मुलगी नक्षत्र (१०) आणि मुलगा मोक्ष (५) हे दुपारी तीनच्या सुमारास आई-वडिलांकडे शेतात आले होते. याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मोक्षवर झडप घातली. काही कळण्याच्या आतच वाघाने त्याला जबड्यात पकडले आणि सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत ओढत नेले.
वडिलांचा आक्रोश, मदतीसाठी धावले शेतकरी-

डोळ्यांसमोर आपल्या मुलावर वाघाने हल्ला केल्याचे पाहून सचिन बुरडे यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकताच आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वाघाने मोक्षला गंभीर जखमी केले होते. काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. वाघाने गळ्याचा भाग पकडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. ज्या दिवशी घरात दिवाळीचे दिवे उजळायला हवे होते, त्याच दिवशी बुरडे कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचा अंधार पसरला.

घटनेची माहिती मिळताच लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील भारती रामलाल नागोसे आणि सरपंच शिवदास बुरडे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मोक्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

वाघाच्या दहशतीने शेतकरी भयभीत; बंदोबस्ताची मागणी

Advertisement

या घटनेनंतर दोनाडसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि बुरडे कुटुंबाला शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.