Published On : Tue, May 29th, 2018

भंडारा-गोंदिया ईव्हीएम घोळ: गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली

Advertisement

भंडारा: ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या प्रकरणात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे आरोप करण्यात आले होते.

त्याठिकाणी नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या सीईओ कादंबरी भगत–बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कादंबरी भगत-बलकवडे या गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणूनही चार्ज घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.

जवळपास 100 ईव्हीएम सोमवारी झालेल्या भंडारा गोंदिया मतदार संघातील निवडणुकीत बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. निवडणूक सहाय्यक अधिकारी अनंत वालसकर यांनी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला असून 35 ठिकाणी मतदान थांबवण्यात आले अशी माहिती दिली होती. तर अभिमन्यू काळे यांनी काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता पण तिथे ईव्हीएम मशीन दुरुस्त करून पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू केली अशी माहिती दिली. एवढेच नाहीतर मतदान प्रक्रिया कुठेही थांबली नाही असा दावाही काळे यांनी केला होता.

जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी 25 मे रोजी रात्री अकरा वाजता तांदुळ पिकाच्या नुकसानीचे गेल्या वर्षीचे 11 कोटी रुपये सहकारी बँकांमध्ये जमा करण्याचे आदेश काढले होते. शनिवारी आणि रविवारी बँका उघड्या ठेवण्याचेही आदेश दिले होते. हाही काळे यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता आणि याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.