नागपूर : सदगुरुंच्या महिमेला ‘ओंकार स्वरूपा, सद्गुरू समर्था’ या गीतातून स्वरसुमनांजली अर्पण करून नामवंत पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी नागपुरकरांच्या मनात ऐन गुलाबी थंडीत भक्तिज्योत पेटविली. शहरातील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी सायंकाळी नामांकित पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या पार्श्वगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्याला नागपुरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
केंद्रीय मंत्री आणि नागपुरचे खासदार नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी वाडकरांच्या गायन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आमदार नागो गाणार, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, माजी महापौर कल्पना पांडे, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, माजी मंत्री रणजित देशमुख आणि संस्कार भारतीच्या कांचन गडकरी उपस्थित होत्या. .
यावेळी वाडकर यांच्याकडे मागील काही वर्षांपासून संगीताचे धडे गिरवत असलेल्या त्यांच्या शिष्या सुरभी खेकाडे आणि मुलगी अनन्या वाडकर या दोघींनीही हिंदी -मराठी गीतांना सुमधूर स्वर चढवत नागपुरकरांची वाहवा मिळविली. ‘प्रेमरोग’, ‘और इस दिल में क्या रखा है’ ही लोकप्रिय गीत गाताना वाडकर स्वतः थिरकायला लागले होते. यानंतर वाडकरांनी सादर केलेली ‘काळ देहाशी आला धावून’ आणि ‘आम्ही आनंदे’ हे भजन ऐकताना महोत्सव भूमी विठ्ठलमय झाली की काय, असा भास होत होता.
अन्यन्याने सादर केलेले ‘रे मेघा रे, मेघा रे’ हे युगलगीत ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. सांस्कृतिक महोत्सवात खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या थिम साँगचे विमोचन करण्यात आले. सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी केले.