इंदूर : प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी आत्महत्या केली आहे. भय्युजींनी स्वत:वर गोळी झाडून स्वत:च जीवन संपवलं. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते नेहमीच सक्रीय होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता.
भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत होते. भय्यू महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं. भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती अजूनही कळू शकलेली नाही.