Published On : Tue, Mar 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सावधान! घरातील ‘यमदूतांना’ वेळीच आवरा; कुलर वापरताना निष्काळजीपणा ठरेल जीवघेणा

Advertisement

नागपूर: विदर्भात उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना कुलरचा गारवा सुखावह वाटतो खरा, पण तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित नसलेला कुलर घरातील ‘यमदूत’ ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांत नागपूरसह परिसरात कुलरच्या ‘शॉक’ने निष्पाप बालकांसह गृहिणींचे बळी गेल्याच्या हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. ही परिस्थिती गंभीर असून, महावितरणने नागरिकांना कुलर वापरताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागपूर आणि लगतच्या परिसरात कुलरमुळे होणाऱ्या अपघातांत सर्वाधिक बळी हे गृहिणी आणि लहान मुलांचे जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. घराच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणी अनेकदा कुलरमध्ये पाणी भरताना किंवा ओल्या हाताने स्विच हाताळताना दुर्लक्ष करतात, तर घराच्या कोपऱ्यात खेळणारी लहान मुले कुलरच्या लोखंडी जाळीला स्पर्श करतात. अलीकडेच शहराच्या विविध भागांत कुलरच्या धक्क्याने झालेल्या अपघातांनी अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. ही छोटीशी निष्काळजी विद्युत धक्क्याला (इलेक्ट्रिक शॉक) निमंत्रण देते, ज्यामुळे हा उन्हाळा अधिकच घातक ठरत आहे.

Gold Rate
Mar 17 2026 - Time 10.23Hrs
Gold 24 KT ₹ 1,58,300/-
Gold 22 KT ₹ 1,47,200 /-
Silver/Kg ₹ 2,62,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महावितरणच्या तांत्रिक विभागाच्या माहितीनुसार, कुलरमध्ये दोष असल्यास आणि घराचे अर्थिंग नसल्यास, कुलरच्या पूर्ण लोखंडी बॉडीमध्ये वीजप्रवाह उतरतो. स्पर्श करताच व्यक्तीला प्राणघातक शॉक बसतो. कुलर सुरू करण्यापूर्वी अर्थिंगची अधिकृत इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करून घ्यावी. केवळ ‘आयएसआय’ (ISI) मार्क असलेलेच कुलर खरेदी करावेत, कारण निकृष्ट दर्जाच्या वायरिंगमुळे शॉट सर्किटचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

सुरक्षेचे महत्त्वाचे कवच म्हणून प्रत्येक घरात ‘अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर’ (ELCB) बसवणे काळाची गरज आहे. यामुळे वीजप्रवाह लीक होताच सेकंदाच्या आत वीजपुरवठा खंडित होतो. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी स्विच बंद करून प्लग सॉकेटमधून बाहेर काढावा. ओल्या हातांनी कोणत्याही विद्युत उपकरणाला स्पर्श करणे टाळावे. लहान मुलांना कुलरपासून दूर ठेवावे आणि कुलरला नेहमी स्वतंत्र पॉवर सॉकेटवरच जोडावे.

तसेच, कुलरमध्ये पाणी भरताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाणी भरण्यापूर्वी कुलरचा मेन स्विच बंद करून प्लग सॉकेटमधून पूर्णपणे बाहेर काढावा. ओल्या हातांनी कोणत्याही विद्युत उपकरणाला स्पर्श करणे टाळावे. विद्युत सुरक्षिततेचे काही सुवर्णनियम पाळणे गरजेचे आहे, ज्यात कुलरला नेहमी स्वतंत्र पॉवर सॉकेटवरच जोडणे, एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे न लादणे, लहान मुलांना कुलरपासून दूर ठेवणे आणि बिघाड आढळल्यास त्वरित तज्ज्ञांकडून दुरुस्ती करून घेणे यांचा समावेश आहे.

दुर्दैवाने, जर कुणाला विजेचा धक्का लागलाच, तर त्या व्यक्तीला थेट स्पर्श न करता कोरड्या लाकडी वस्तूच्या साहाय्याने कुलरपासून लांब करावे आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. कोणत्याही विद्युत अपघाताची माहिती देण्यासाठी महावितरणच्या 1912 किंवा 19120, 18002123435, 18002333435 या टोल फ्री क्रमांकांवर चोवीस तास संपर्क साधावा. घराघरातील या ‘विद्युत यमदूतांना’ तांत्रिक तपासणीच्या साखळीने आवरा आणि सुरक्षित उन्हाळा अनुभवा, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement