Published On : Sun, Dec 1st, 2019

परवानगीशिवाय रस्ता खणला तर खबरदार…..!

Advertisement

महापौर संदीप जोशी यांचा एजन्सीजना इशारा : महिनाभरात सर्व फुटपाथ चालण्यायोग्य करण्याचे दिले ‘टारगेट’

नागपूर : नागपूर महानगरपालिकेने कुठे नवा रस्ता बनविला तर तो खणण्यासाठी शहरात कार्यरत एजन्सीज तयारच असतात की काय, असे आता वाटू लागले आहे. अनेक एजन्सीज परवानगी न घेताही रस्ता खणतात. पुनर्भरणाचा प्रश्न तर वेगळाच विषय आहे. शहरात कार्य करणाऱ्या अन्य विभागांनी यापुढे नागपूर महानगरपालिकेसोबत समन्वय ठेवायलाच हवा. मनपाच्या मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय जर यापुढे शहरातील रस्ते कुठल्या एजन्सीने खणले तर खबरदार….असा कडक शब्दात इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. इतकेच नव्हे तर महिनाभरात संपूर्ण शहरभरातील फुटपाथ चालण्यायोग्य करा, असे निर्देश देत फुटपाथ दुरुस्ती आणि अतिक्रमण हटविण्याचा कार्यक्रमच आखून दिला.

शहरातील फुटपाथ, सीमेंट रस्त्यांची गुणवत्ता, चोक झालेल्या ड्रेनेज लाईन, क्षमतेपेक्षा अधिक काम घेणाऱ्या कंत्राटदारामुळे काम पूर्णत्वाला होणारा उशीर आणि घसरलेली गुणवत्ता या विषयांच्या अनुषंगाने महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी (ता. ३०) लोककर्म विभागाची तातडीची बैठक बोलाविली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित बैठकीला स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, राजेश भुते, सोनाली चव्हाण, श्री. खोत, अमीन अख्तर, महादेश मेश्राम, धनंजय मेंढुलकर उपस्थित होते.

नागपूर शहरात मेट्रो, बीएसएनएल, महावितरण, ओसीडब्ल्यू असे विविध विभाग कार्य करीत असतात. या विभागाकडून अनेक ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम केले जाते. काहींनी परवानी घेतलेली असते. परंतु अनेक विभाग परवानगीविनाच खोदकाम करीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. इतकेच नव्हे तर काम पूर्ण झाल्यानंतर पुनर्भरणाचे काम व्यवस्थितरीत्या केल्या जात नाही. यामुळे नागरिक वैतागले आहेत. या एजन्सीजवर कुणाचेही नियंत्रण नाही, असे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे यासंदर्भात असलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी. मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलाही रस्ता खणल्या जाणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. शहराचे विद्रुपीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नागपूर शहरातील फुटपाथ हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. संपूर्ण शहरात फुटपाथवर अतिक्रमण आहे. जे फुटपाथ रिकामे आहेत, ते तुटलेले असल्याचे निदर्शनास येते. ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ या उपक्रमांतर्गत नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांचा याविषयीचा संताप समोर येऊ लागला आहे. आता यापुढे हे चालणार नाही. फुटपाथवरील अतिक्रमण हटविणे ही प्रशासनासोबतच पदाधिकाऱ्यांचीही जबाबदारी आहे. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिक्रमण या विषयावर विशेष सभा ९ डिसेंबर रोजी बोलाविण्यात आली आहे. अतिक्रमणापासून मुक्ती आणि चालण्यायोग्य फुटपाथ हा अजेंडा ठेवून पुढील एक महिन्यात कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले. फुटपाथ दुरुस्तीसाठी दहाही झोन मिळून प्राथमिक अंदाजानुसार सहा कोटी रुपयांची आवश्यकता असून ७ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करा आणि तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले.

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांचे कंत्राट होणार रद्द
नागपूर शहरात सीमेंट रस्त्यांसोबतच अनेक कामे सुरू आहे. ज्याची क्षमता नाही असा कंत्राटदार अनेक कामे घेऊन बसला आहे. जानेवारी २०१७ मध्ये कार्यादेश मिळालेले कार्य अद्यापही सुरू झाले नाही, ही गंभीर बाब आहे. अशा कंत्राटदाराकडून शपथपत्र घ्या. नसेल देत तर तातडीने कंत्राट रद्द करा, असे निर्देश महापौर संदीप जाधव यांनी दिले. यापुढे काम देताना संबंधित कंत्राटदाराकडे अन्य किती कामे आहेत, हे सुद्धा तपासण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

सीमेंट रस्त्यांचे नवे धोरण ठरवा
सदर बैठकीत कार्यकारी अभियंत्यांनी नागपूर शहरातील अंतर्गत रस्ते सीमेंटचे नको, अशी सूचना मांडली. नागरिकांना उंच रस्ते नको आहेत. यामुळे खर्च वाढतो. अनेक अडचणी येतात. कार्यकारी अभियंत्यांच्या या सूचनेला गांभीर्याने घेत सीमेंट रस्त्यांबाबतचे आणि अंतर्गत रस्त्यांबाबतचे नवे धोरण आठ दिवसांत ठरविण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले.

मेट्रोलाईनवरील फुटपाथसाठी द्या पत्र
वर्धा रोड, सेंट्रल एव्हेन्यू रोड या मार्गावरील फुटपाथ नागपूर मेट्रो करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच त्यांना लेखी पत्र देण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. जे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे आहे, त्यांनी तसा पत्रव्यवहार मेट्रोशी करायला हवा. तरीही मनपाकडून तातडीने मुख्य अभियंत्यांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.