नागपूर :शहरात बर्ड फ्लूचा उद्रेक सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे? पुण्याच्या आणि नंतर भोपाळ मधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर चार मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे अहवालातून समोर आले.
राज्य सरकारच्या ज्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू चा उद्रेक झाला, त्याच्या एक किमीच्या परिघात पशु वैद्यकीय विद्यापीठाचा ही पोल्ट्री फार्म असून तिथल्या 260 कोंबड्याना ही मारण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र व्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतर कुठल्याही पोल्ट्री फार्म वर सध्या बर्ड फ्लू चा संक्रमण झाल्याची माहिती समोर आलेली नाही, असा दावाही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केला आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर ॲक्शन मोडवर –
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखड्यानुसार अंडी उबवणी केंद्रापासून एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तसेच दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. केंद्रातील ८ हजार ५०१ पक्षी आणि १६ हजार ७७४ अंडी, ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॅा. इटनकर यांनी कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले.
तसेच बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील २१ दिवसांपर्यंत प्रतिबंधही लागू केले. संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर त्रिज्येतील निगराणी क्षेत्रात अबाधित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी, अंडी व कुक्कुट खाद्य यांच्या वाहतुकीस मज्जाव राहणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.