| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 29th, 2017

  मनपाच्या दुकानांच्या परस्पर विक्रीला बसणार पायबंद : संजय बंगाले


  नागपूर
  : मनपाच्या परवानेधारक गाळेधारकांना यापुढे नियमानुसार दुकानांची परस्पर विक्री करता येणार नाही. त्यांना दुकाने परस्पर हस्तातंरीत करण्याची मुभा जी देण्यात आली आहे त्यावरही पुर्नविचार करुन रेडीरेकनर दरानुसार यापुढे गाळेधारकांकडून शुल्क वसूल करण्यात येईल. याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी केल्या.

  सोमवार दिनांक २९ मे रोजी मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची बैठक पार पडली. बैठकीत सभापती संजय बंगाले यांनी वरील सूचना प्रदान केल्या. याप्रसंगी उपसभापती अभय गोटेकर, समिती सदस्या ज्योती भिसीकर, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम, उपायुक्त रवींद्र देवतळे, बाजार समितीचे डी.एम. उमरेडकर उपस्थित होते. बैठकीत सभापती यांनी बाजार संदर्भातला विस्तृत आढावा घेतला. झोननिहाय मनपाचे किती दुकाने, ओटे व खुल्या जागा आहेत. रस्त्यांवर भरणारे बाजार, वाहतूक कोंडी, अनाधिकृत बाजार भरवणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेचा शोध घेणे, रस्त्यांवर भरणऱ्या बाजारामुळे नागरिकांची सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका करणे इत्यादी विविध बाबींवर चर्चा झाली. गोकूळपेठसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अधिकृत ओटे सोडून फेरीवाले व दुकानवाले भर रस्त्यात बाजार भरवतात. बाजार संपल्यावर त्याच ठिकाणी कचरा टाकून निघून जातात. याला कायमचा पायबंद बसावा, यासाठी झोनच्या सहायक आयुक्तांनी प्रभावी उपाययोजना सुचविण्याचे निर्देश सभापतींनी बैठकीत दिले. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समितीचे सर्व सदस्य नागपुरातील सर्व बाजारांचा दौरा करणार असून यावेळी झोनच्या सहायक आयुक्तांनी मनपातर्फे आवंटित केलेली दुकाने, ओटे, खुली जागा वापरणाऱ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना यावेळी सभापतींनी केल्या. बाजार दौऱ्यावेळी वाहतूक पोलिसांना सोबत घेतले जाईल; यासाठीचे पत्र वाहतूक विभागाला देण्याची सूचना त्यांनी केली.

  दटके समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मनपाचे ओटे व दुकाने वापरणाऱ्या अधिकृत वापरकर्त्यांनी मनपातर्फे वाढविण्यात आलेल्या शुल्कावर आक्षेप नोंदविला होता. या अहवालावर येणारा दटके समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मनपाला उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे गरजेचे आहे. यावर्षी सहा करोड ३४ लाख एवढीच वसुली बाजार समितीला साध्य करता आली असून नागपूर शहराचा व्याप बघता दरवर्षी २५ कोटी एवढे उत्पन्न मनपाला बाजार समितीकडून अपेक्षित असल्याचे सभापतींनी सांगितले. यासाठी जे ओटेधारक, गाळेधारक कर भरत नाही त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. अद्याप गाळेधारक जुन्याच दराने कर भरत असल्याचे लक्षात आले असून दटके समितीच्या जोडीनेच स्थापत्य समितीही महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांना अहवाल सादर करणार असल्याचे सभापती यांनी दिशानिर्देश दिले. मनपाच्या दुकानांच्या परस्पर विक्रीलाही पायबंद बसेल, यासाठी प्रभावी उपाययोजनेबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश सभापजी संजय बंगाले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145