बेसा-बेलतरोडीचा 40 वर्षाचा विकास आराखडा तयार करणार : बावनकुळे

-नागपूर ग्रामीणमध्ये पालकमंत्र्यांचा जनसंपर्क
-फडणवीस यांचे सरकार येणारच

नागपूर: बेसा-बेलतरोडी नगर परिषद करून या भागाचा 40 वर्षानंतरचा विकास कसा असेल याचा आराखडा तयार करून नियोजनबध्द विकास करण्यात येईल. आजपर्यंत या भागात आपणच विकास कामे केली आहेत. एकही काम काँग्रेसचे या भागात नाही. राज्यात पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासन पदारूढ होणार असल्यामुळे अधिक विकास कामे होणार आहेत, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Advertisement

बेसा-बेलतरोडी, पिपळा, हुडकेश्वर, नरसाळा या भागात नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क करून भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. या सर्व बैठकी आणि जनसंपर्क कार्यक्रमात पालकमंत्र्यांसोबत माजी जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, माजी पं.स. सभापती अजय बोढारे, रामराज खडसे, संजय भोयर, नरेश मोटघरे, राजूरकर, सरपंच नरेश भोयर, बानाईत, चांदूरकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी आज या भागात आठ ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या बैठकी घेऊन मतदारांशी संपर्क केला.

राज्यातील बारा कोटी जनतेच्या सर्व गरजा पूर्ण करणारे हे सरकार असल्याचे सांगून बेलतरोडी येथे पालकमंत्री म्हणाले- सर्वेक्षणानुसार पुन्हा 220 आमदारांसह देवेंद्र फडणवीस शासन पदारूढ होणार आहे. माणसापेक्षा कमळ चिन्ह महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी 75 टक्केपेक्षा अधिक व्हावी यासाठी प्रयत्न करावे. आपल्या जीवनातील पुढचे 15 दिवस पक्षासाठी द्या असे आवाहनही त्यांनी केले.

बेसा येथे बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, 21 व्या शतकातील मजबूत भारत निर्माण करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पाहिले असून त्या दृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. अमेरिकेत जाऊन तेथील जनतेसमोर विवेकानंदाचे जीवन मांडणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. 70 वर्षात काँग्रेसला कधीही विवेकानंद परदेशात मांडून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकावा असे वाटले नाही. समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारे हे सरकार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

हुडकेश्वर भागात बोलताना ते म्हणाले- मनपरिवर्तन करून मतपरिवर्तन करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जी मते आपल्याकडे येणार नाही, त्या मतांमध्ये परिवर्तन करून कमळाला ती मते मिळतील यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रचंड कामे उभी केली आहेत. रस्ता वीज पाणी ही कामे तर करायचीच आहेत, याशिवायही हुडकेश्वर नरसाळा या भागाचा आणखी विकास करायचा आहे. त्यासाठी राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पदावर येणे आवश्यक आहे. आपले एकेक मत कामाचे आहे. ग्रामपंचायतीप्रमाणे सूक्ष्म नियोजन करून या निवडणुकीला कार्यकर्त्यांना सामोरे जायचे असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्र्यांच्या या जनसंपर्क दौर्‍याला सर्व बैठकीमध्ये कार्यकर्त्यांसोबतच नागरिक आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचे प्रचंड उत्साहात स्वागत केले.

Advertisement
Advertisement
Advertisement