Published On : Thu, Feb 1st, 2018

नि:शुल्क आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

Advertisement


नागपूर: महापौर नंदा जिचकार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम मंडळ प्रभाग क्र. ३७ च्या वतीने गुरुवारी (ता. १) प्रताप नगर विद्यालय येथे नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आरोग्य शिबिराचे आयोजन दक्षिण-पश्चिम मंडळ प्रभाग ३७ चे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या आरोग्य शिबिरात विविध तपासणी करून घेण्यासाठी नागरिकांची रीघ लागली होती. यावेळी बालरोग चिकित्सा, स्त्री रोग चिकित्सा, हृदय रोग चिकित्सा, दंत तपासणी, नेत्र तपासणी, जनरल चेकअप, स्तन कर्करोग निदान, शल्य चिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, मोफत औषधी सुविधा आदींचा समावेश होता.

शिबिराला राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. दीपप्रज्वलन करून त्यांनी शिबिराचे विधीवत उद्‌घाटन केले. वाढदिवशी कुठलाही बडेजाव न करता सामाजिक जाणीवेतून कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आयोजित केलेले आरोग्य शिबिर अभिनंदनीय उपक्रम असल्याचे ते म्हणाले.


दरम्यान शिबिराला भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा उपसभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेविका सोनाली कडू, भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाचे पालक प्राचार्य राजीव हडप, भाजप नागपूर शहर महामंत्री भोजराज डुंबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.

आरोग्य शिबिरासाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. उदय नारलावार, डॉ. अविनाश गावंडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत होती. या शिबिरात असलेली दंत चिकित्सा व्हॅन ही पहिल्यांदाच कुठल्या शिबिरात आणण्यात आली होती.


वाढदिवसाचे औचित्य साधून जेसीआय नागपूर ओरियन्टतर्फे महापौर नंदा जिचकार यांच्या घरासमोर स्वच्छतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेवर आधारीत पेंटिग तयार केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम मंडळ प्रभाग क्र. ३७ च्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.