Published On : Tue, Sep 24th, 2019

टीका करण्या आधी मोदींचे कुटनीतिक कौशल्य लक्षात घ्या-ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख

कामठी :-विरोधकांनी मोदीं वर टीका करण्याआधी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी वापरलेलं राजनैतिक व कुटनीतिक कौशल्य, आणि देशांतर्गत सीमांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेले प्रामाणिक प्रयत्न या गोष्टी लक्षात घ्याव्या असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री विनोद देशमुख यांनी केले. वृत्तपत्र लेखक मंचातर्फे आयोजित वृत्तपत्र स्तंभलेखक प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल लिखित “भारताचे परराष्ट्र धोरण : मोदी पर्व 2” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विदर्भ प्रीमिअर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचे उपाध्यक्ष श्रीपादजी रिसालदार होते.

विनोद देशमुख यांनी आपल्या भाषणात मोदींच्या आतापर्यंतच्या कार्यकाळाचा आढावा घेतला आणि मुद्देसूद विश्लेषण केले. श्रीपाद रिसालदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सुधीर अग्रवाल सातत्यपूर्ण लिखाणाची दखल घेत वृत्तपत्र लेखक मंचाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले.

साधारणतः प्रकाशन समारंभात होणाऱ्या लेखकाचे मनोगत या कार्यक्रमा ऐवजी प्रकाशनापूर्वी पुस्तकाचे लेखक सुधीर अग्रवाल यांना महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण लिखाणाच्या अनुषंगाने उपस्थितांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या उत्तरातून लेखकाच्या अंतरंगाची उकल असा आगळा वेगळा वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देव यांनी केले तर प्रास्ताविक मंचाचे संयोजक मनोज वैद्य यांनी केले. एकमेकांच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन उत्तम लेखक तयार व्हावे या मंचाच्या मूळ उद्देशा करीता या प्रकाशन समारंभात सहभागी होऊन दिलेल्या प्रोत्साहना बद्दल सर्व उपस्थितांचे प्रसाद पोफळी यांनी आभार मानले.

या प्रसंगी विशेषत्वाने उपास्थित ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नाईकवाडे, पर्यटन स्तंभ लेखक श्रीकांत पवनिकर, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे माजी अध्यक्ष पुरूषोत्तम चन्ने, चित्रपट विषयक स्तंभलेखक रमेश पोफळी, मनोहरराव लोहकरे, नाट्यलेखिका डॉ माणिकताई वड्याळकर यांच्या सोबतच प्रा. डॉ. रत्ना चौधरी, सौ. माला अग्रवाल, मंजुषा कस्तुरकर, सोनाली कोठेकर, राकेश वैद्य, जयश्री देशकर, रजनी आवते,प्रा रुपाली लढाऊ आणि मंचाचे इतर सदस्य उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी