Published On : Sun, Jun 23rd, 2019

नागपुरातून धडाक्यात मद्य तस्करी

Advertisement

नागपूर: मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाजवळील लोखंडी पुल ते मनपा पुलावरून मद्यतस्करी धडाक्यात सुरू आहे. नागपुरातून खरेदी केलेली दारू बंदी असलेल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात पाठविली जाते. मात्र, लोहमार्ग पोलिसांना मद्य तस्कर मिळत नाही.

रेल्वे स्थानकाचा आऊटर भाग असलेल्या लोखंडी पुलाजवळ नेहमीच असामाजिक तत्वांचा वावर असतो. अलिकडे नव्याने गर्डर घालून मनपा अंडर ब्रिज बांधण्यात आला. या दोन पुला दरम्यान गाड्यांची गती कमी झाली किंवा गाडी थांबल्यास खाद्य विक्रेत (अवैध) आणि तृतियपंथी गाडीत चढतात. तस्करांना या बाबत चांगलीच माहिती असल्याने येथूनच मद्य तस्करी केली जाते.

मागील काही महिण्यांपासून सातत्याने हा प्रकार सुरू आहे. मात्र, याकडे डोळेझाक केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. यापुर्वी आरपीएफचा एक जवान असताना नियमीत दारू तस्करी पकडली जायची. त्याच्या कारवाईमुळे मद्य तस्करांना घाम फुटला होता. परंतु त्यातुलनेत लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई दिसून येत नव्हती.

सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार जवळपास परिसरातून खरेदी केलेली दारू या मार्गाने जाणाºया संपर्क क्रांती एक्स्प्रेस, कोरबा एक्स्प्रेस, केरळ एक्स्प्रेस आणि स्वर्ण जयंती एक्स्प्रेने पाठविली जाते.

मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० पर्यंत पेट्या पाठविल्या जातात. गाडीची गती कमी झाल्यावर दारूच्या पेट्या बोगीत टाकतात. सोबत एक जन असतो. चंद्रपुरच्या आऊटवर चालत्या गाडीतून माल फेकल्यानंतर तेथूनच इतर ठिकाणी दारूची विलेवाट लावली जाते. याप्रकारे मागील काही महिण्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.