Published On : Wed, Jul 3rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

पावसाळ्यात विजेबाबत सतर्क राहा

Advertisement

नागपूर– वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणापासून सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो, अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

अतिवृष्टी, वादळी पाऊस आदींमुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीज तारांवर पडतात. यामध्ये वीजखांब वाकतात, वीजतारा तुटतात किंवा लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने, त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Today’s Rate
Saturday 05 Oct. 2024
Gold 24 KT 76,100/-
Gold 22 KT 70,800/-
Silver / Kg 93,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अथग केल्याची खात्री करून घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरावी. सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावीत. विशेषतः ग्रामीण भागात विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत, अशा सूचना महावितरणने दिल्या आहेत.

Advertisement

अभियंते व जनमित्रांची कसोटी

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खऱ्या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचाऱ्यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो. अशा वेळी वीज ग्राहकांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत अभियंते व जनमित्रांना वारंवार फ़ोन न करता महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 18002-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. यासह महावितरण मोबाइल अॅप आणि www.mahadiscom.in या वेबसाइटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER Consumer Number हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाइल क्रमांकावर पाठवल्यास तक्रार नोंदवली जाते. याशिवाय ‘ऊर्जा चॅट बॉट देखील ग्राहकाला 24 X7 थेट मदत करीत आहे.

पावसाळ्यात ग्राहकांना वीजे संदर्भात वेळोवेळी अपडेट मिळावेत, ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महावितरणने अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून अधिकाधिक ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.