नागपूर: फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड येथील कथित सरकारी जमीन घोटाळ्याप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर मोठी कारवाई झाली आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख (एसएलआर), नागपूर यांनी या प्रकरणात सरकारी जमिनीवरील चुकीच्या सिटी सर्व्हे नोंदींची पुष्टी करत त्या दुरुस्त करण्याचे आणि सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
अन्याय निवारण मंचाच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी या प्रकरणाची तक्रार महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
चौकशीत असे समोर आले की, मौजा बोरगाव येथील खसरा क्रमांक १५६ ही सुमारे २८ हजार चौरस फूट सरकारी जमीन महसूल विभागाच्या ७/१२ उताऱ्यावर आजही महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. मात्र, त्याच जमिनीवरून तयार करण्यात आलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक ५३७, ५३९, ५४०, ५४२ आणि ५४३ मध्ये खाजगी व्यक्तींची नावे नोंदविण्यात आली होती.
या जमिनीवर हनुमान मंदिर, सार्वजनिक विहीर आणि इतर सरकारी मालमत्ता असूनही सिटी सर्व्हे कार्यालय क्र. ३ मधील नोंदींमध्ये झालेल्या त्रुटींची फेरचौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम २० अंतर्गत दिले आहेत.
२३ जुलै रोजी सिटी सर्व्हे अधिकारी अजित साळुंखे यांनी सिटी सर्व्हे क्रमांक ५४२ संदर्भात सुनावणी घेतली. यावेळी ज्वाला धोटे, जय हनुमान सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र तायवाडे आणि मंदिराचे भाविक उपस्थित होते. याच सुनावणीत एसएलआरच्या आदेशाची माहिती समोर आली.
ज्वाला धोटे यांनी सांगितले की, या आदेशामुळे संबंधित जमीन शासनाचीच असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा सिद्ध झाला आहे. त्यांनी सिटी सर्व्हे कार्यालयाने चौकशी तातडीने पूर्ण करून खाजगी व्यक्तींच्या बेकायदेशीर नोंदी रद्द कराव्यात आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच, प्रकरणाची दखल घेऊन त्वरित निर्देश दिल्याबद्दल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी आभार मानले.





