Published On : Mon, Apr 27th, 2020

आमदार निवासातील क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेक समस्या बावनकुळेंनी जिल्हाधिकारी-मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले

Advertisement

नागपूर: आमदार निवासात कोरोना पेशंटसाठी क्वारंटाईन सेंटर सुरु झालेले आहे. पण या केंद्रात अनेक समस्या असून या समस्यांकडे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे लक्ष वेधले आहे.

शहर आणि ग्रामीण भागातील संशयित कोरोना बाधित रुग्णासाठी आमदारा निवासात क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहे. तेथे अनेक संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जो संशयित रुग्ण या केंद्रात भरती असतो, त्या रुग्णाचा अहवाल 14 दिवसात पॉझिटिव्ह आला तर त्याला मेयो किंवा मेडिकलमध्ये पाठविल्यानंतर संबंधित रुग्णाची खोली निर्जंतुकीकरण (सॅनिटाईज) केली जात नाही. पॉझिटिव्ह अहवाल असलेला रुग्ण मेयो, मेडिकल येथे स्थानांतरित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचे कर्मचारी त्याच जागी दुसर्‍या रुग्णाना क्वारंटाईन करतात. त्यामुळे निगेटिव्ह रुग्णही पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एका खोलीतील रुग्ण दुसर्‍या खोलीत जाऊन बसतात व येथे येऊन जेवण करतात. त्यामुळेही निगेटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह होऊ शकतो. तसेच एका खोलीतच 4-5 रुग्णांना भरती केले जात आहे. या बाबींकडे तीव्रतेने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच जे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी या केंद्रात आपली सेवा देत आहेत, त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे ते आपले योगदान योग्य प्रकारे करू शकत नाही.

आमदार निवास क्वारंटाईन सेंटरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. आमदार निवासाच्या प्रत्येक इमारतीत कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत. त्यामुळे माणसांसोबतच जनावरांनाही कोरोना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आलेले नागरिक नियमानुसार राहात आहेत की नाही याची तपासणी करणेही कगरजेचे आहे, याकडे लक्ष वेधून बावनकुळे यांनी या प्रकरणी त्वरित कारवाईची मागणी केली आहे.