
बारामती: राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासासाठी वापरलेले खाजगी विमान आज सकाळी बारामतीजवळ कोसळले. धावपट्टीवर उतरण्याआधीच विमानाचे संतुलन बिघडल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
अधिकृत माहितीनुसार, हे विमान सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी सुमारे ८.५० वाजता बारामती विमानतळावर लँडिंग होणे अपेक्षित होते. मात्र, लँडिंगपूर्वीच विमान जमिनीवर आदळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी विमानाचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. मदत आणि शोधकार्यात आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून, प्रवासी यादीच्या आधारे विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
अपघातग्रस्त विमान कोणाच्या मालकीचे?
या दुर्घटनेतील विमान VSR नावाच्या खाजगी विमान सेवा देणाऱ्या कंपनीचे असल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान Learjet 45 या प्रकारातील असून, खाजगी आणि व्यावसायिक प्रवासासाठी वापरले जात होते. विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK असा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन रोहित सिंग आणि व्ही. के. सिंग हे VSR कंपनीचे सहमालक आहेत.
तपास सुरू-
विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक अडचण, हवामानातील बदल किंवा मानवी त्रुटी, या सर्व बाबी लक्षात घेऊन DGCAकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या दुर्घटनेनंतर बारामती परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.








