नागपूर : स्वातंत्र्यदिन आणि श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व चिकन व मांस विक्रीची दुकाने तसेच कत्तलखाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश मनपाच्या आरोग्य विभागाने जारी केले आहेत. या आदेशामुळे त्या दिवशी नागरिकांना मांसाहारी पदार्थांची खरेदी करता येणार नाही.
महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सणाच्या दिवशी शहरात स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व सामाजिक सौहार्द अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अशा दिवशी मांस व चिकन विक्री टाळल्यास वातावरणात स्वच्छता आणि सणाचा पवित्रपणा टिकून राहतो, असे मनपाचे म्हणणे आहे.
संबंधित सर्व व्यावसायिक व कत्तलखाने चालविणाऱ्यांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर मनपा कायदेशीर कारवाई करणार असून दंडात्मक कार्यवाहीचाही इशारा देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मांस व चिकनप्रेमींना १५ ऑगस्टसाठी आगाऊ खरेदी करून ठेवावी लागणार आहे. तसेच काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना सणापूर्वीच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सणाच्या दिवशी गैरसोय होऊ नये.
अशा प्रकारची बंदी पूर्वीही प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, महावीर जयंती आदी महत्त्वाच्या दिवशी लागू करण्यात आली आहे. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा नियम पुन्हा एकदा लागू होत आहे.