नागपूर : ओंकार नगर चौकात आज दुपारी धावत्या कारला अचानक आग लागून एकच खळबळ उडाली. फोर्ड फिगो कारमध्ये अचानक धूर आणि ज्वाळा उसळल्याने काही क्षणांत परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत वेळेवर वाहन थांबवून बाहेर पडल्याने मोठा अपघात टळला.
घटनास्थळी काही मिनिटांतच अग्निशमन दल पोहोचले आणि प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणली. या आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कारचे मालक शैलेश कावरे यांनी कार थांबवत तत्काळ बाहेर उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेनंतर काही वेळ चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.