Published On : Thu, Dec 12th, 2019

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या मागणीसाठी भाजयुमोचा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव

Advertisement

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नागपूर येथील हैद्राबाद हाऊस मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व मुख्यमंत्री कार्यालय पूर्ववत सुरु करण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी श्री.रविंद्रजी ठाकरे यांचा घेराव केला व निवेदन दिले.

भाजपा युवा मोर्चा च्या शहराध्यक्ष शिवानी दानी यांनी निवेदनात सांगितले की, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-राका व कॉंग्रेसचे तिकडमबाज सरकार स्थापन होताच नागपुरात हैद्राबाद हाऊस येथे सुरु असलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व येथील संपूर्ण कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले. नागपूरच नव्हे तर विदर्भातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय सहायता निधी या कार्यालयाचे माध्यमातून सहज उपलब्ध होत होती. शेकडो नाही तर हजारोच्या संख्येने या कार्यालयातून लाभ गोर-गरीब रुग्णांना मिळाला. जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याची अतिशय उत्कृष्ट योजना या कार्यालयात सुरु होती.

इतकेच नव्हे तर वैद्यकीय वगळता मुख्यमंत्री स्तरावरचे अन्य कामकाज देखील या कार्यालयातून होत असल्यामुळे या कार्यालयाला मिनी मंत्रालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच कामगारांसाठी असलेली योजना सुद्धा या कार्यालयातून राबविण्यात आली होती व लाखो कामगारांनी या योजेनेचा लाभ घेतला होता.

अशावेळी नवीन सरकारने सदर कार्यालय बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागपुरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील जनतेवर अन्याय झालेला आहे. अनेक रुग्णांचे प्रलंबित या कार्यालयात असतानाच हे कार्यालय बंद केल्यामुळे अनेक गरीब रुग्ण हेतुपुरस्कर या योजनेपासून वंचित ठेवण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचे लक्षात येत आहे. अंथरुणावर खिळलेल्या व मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचे श्राप हे सरकार घेत असून फार मोठ्या पुण्याच्या कामात अडथळा आणण्याचे काम नवीन सरकार करीत आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष देण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होताच विदर्भावर विशेषत: नागपूरकरांवर याचे विपरीत पडसाद दिसून येत आहे. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपुरातील हैद्राबाद येथे आधी सुरु असलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व येथील मुख्यमंत्री स्तरावरचे कामकाज पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली. आता भारतीय जनता युवा मोर्चा सुद्धा गोर-गरिबांच्या हक्कासाठी या लढाईत सहभागी होत असल्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात भा.ज.प. या मुद्यावरून अधिकच आक्रामक भूमिका घेणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

यावेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष शिवानी दाणी, महामंत्री बालु रारोकर, जितेंद्रसिंग ठाकूर, राहुल खंगार, सचिन करारे, सन्नी राऊत, सचिन सावरकर, सारंग कदम, दिपांशु लिंगायत, कमलेश पांडे, वैभव चौधरी, आलोक पांडे, नेहल खानोरकर, योगी पाचपोर, अतुल खोब्रागडे, तुषार ठाकरे, आसिफ पठाण, गोविंदा काटेकर, पिंटू पटेल, आशिष चिटणवीस व अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.