Published On : Fri, Oct 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आमदार बच्चू कडू यांच्या पीएचा नशेत धुमाकूळ; भरधाव कारने दोन वाहनांना उडवले!

डिलिव्हरी बॉयची प्रकृती गंभीर; अपघातानंतर जखमीला सोडून पळाल्याचा आरोप
Advertisement

नागपुरात बच्चू कडू यांच्या पीएचा नशेत धुमाकूळ; भरधाव कारने दोन वाहनांना उडवले!

नागपूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून दोन वाहनांना धडक दिल्याच्या आरोपावरून आमदार बच्चू कडू यांचे खासगी सहायक केतन हिवंज यांना पोलिसांनी अटक केली आहे. दसऱ्याच्या रात्री घडलेल्या या अपघातात २८ वर्षीय डिलिव्हरी बॉय राहील शकील शेख गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पार्टीतून कारने घरी परतत असताना केतन हिवंज यांच्या कारने संविधान चौकाजवळ राहीलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे राहील रस्त्याच्या कडेला फेकला गेला. मात्र, अपघातानंतर जखमीला मदत करण्याऐवजी आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप आहे.

यानंतर कस्तुरचंद पार्कजवळ उड्डाणपुलाच्या दिशेने जाताना आरोपीच्या कारने एका पिकअप वाहनालाही धडक दिली. दुसऱ्या अपघातानंतर कार थांबल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सीताबर्डी पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेले. तपासणीत त्याच्या रक्तात मद्य आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, अपघातात दुखापत करणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवण्यासंदर्भातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Advertisement

दरम्यान, गंभीर जखमी झालेला राहील हा आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. सणासुदीच्या काळात मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या बेजबाबदारपणामुळे एका कुटुंबावर संकट ओढवले आहे. या घटनेमुळे शहरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.