नागपूर : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शहरात सुरु असलेल्या बाळ तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे.
यासंदर्भात स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जरीपटका पोलिसांच्या हद्दीत १५ दिवसांच्या बाळाला आईपासून वेगळे करून विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीची प्रमुख श्वेता खान या नावाची महिला असल्याचे समोर आले आहे. या महिलेमार्फतच या मुलाची विक्री करण्यात आली होती.या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. एका महिलेला प्रसुतीसाठी आपल्याजवळ ठेऊन घेत, प्रसुती होताच तिच्या पंधरा दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या रेखा आप्पासो पुजारी (वय ५४) आणि मुन्नीबाई द्वारकाप्रसाद लिलारे (वय ४८, दोघी रा. निर्मल कॉलनी, जरीपटका) यांच्या विरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही महिला श्वेता खानसाठी काम करत होत्या.
माहितीनुसार, 2012 मध्ये 30 वर्षीय महिलेचा विवाह बालाघाट येथील तरुणाशी झाला होता. त्याला 3 मुलेही होती. 2018 मध्ये कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर या तरुणाची पत्नी ती बालाघाटहून नागपुरात आली आणि गिट्टीखदान पोलीस स्टेशन परिसरात राहू लागली. ती वेळोवेळी बालाघाटला जात असे. ऑक्टोबर 2021 मध्ये, बालाघाटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान या महिलेची एका ओळखीच्या तरुणाशी भेट झाली. संभाषणाच्या बहाण्याने त्याने महिलेला जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्या व्यक्तीने महिलेला दिली. बदनामीच्या भीतीने पीडिता शांत राहिली आणि काही दिवसांनी ती नागपुरात आली.
यादरम्यान महिलेला ती गरोदर असल्याचे कळले. यानंतर पीडित महिलेची मुन्नीबाईशी भेट झाली. मुन्नीबाईंनी तिला मदतीचे आश्वासन दिले आणि गर्भपात न करण्याचा सल्ला दिला. नंतर मुन्नीबाई तिला रेखा पुजारीच्या घरी घेऊन गेली. पीडित महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 2 मार्च 2022 रोजी महिलेने मेयो हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. 3 दिवसांनंतर रेखाने पीडितेला आणि तिच्या मुलाला घरी नेले. २१ मार्च रोजी रेखा आणि मुन्नीबाई यांनी पीडितेला घरी सोडले आणि बाळाची तपासणी करण्याच्या बहाण्याने त्याची विक्री केली.
पीडित महिलेला कळले असता त्यांनी दोन्ही महिलेला यासंदर्भात जाब विचारला. त्या दोघीनींही तिला तिचे मूल विकल्याचे सांगितले. रेखा आणि मुन्नीबाई यांनी पीडित महिलेला बाळाची विक्री केल्याची बाब कोणाला सांगितली तर तुला जीवे मारू अशी धमकीही दिली. याप्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शहरात बाळ तस्करी करणाऱ्या श्वेता खान आणि तिच्या टोळीचा भांडाफोड झाला. याअंतर्गतच कोराडी प्रकरणात मुन्नीबाई आणि रेखा यांची भूमिका समोर आली आणि गुन्हे शाखेने त्यांना अटक केली.
अधिक चौकशीत वरील महिलेच्या मुलाची विक्री केल्याची माहिती समोर आली असून याबाबत जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता खान आणि तिच्या टोळीवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहेत. तपासानंतर आणखी प्रकरणे उघडकीस येऊ शकतात. श्वेता खानने बाल तस्करीचा व्यवसाय करण्यासाठी बालाघाटमध्ये रुग्णालय उघडले होते. नागपुरातील एक डॉक्टर या टोळीला मदत करत असल्याची माहिती समोर येत आहे.