Published On : Thu, Apr 30th, 2020

नागपुरात श्री साई मंदिरचे संस्थापक बाबासाहेब उत्तरवार यांचे निधन

नागपूर : वर्धा महामार्गावरील छत्रपती चौक येथील श्री साई मंदिरचे संस्थापक व श्रीसाईसेवा मंडळाचे माजी सचिव बाबासाहेब उत्तरवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे सुनिल व अनिल ही दोन मुले व तीन मुली आहे. मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री साई मंदिराच्या स्थापनेत बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. निस्सिम साईभक्त असलेले बाबासाहेब सीताबर्डी, मोदी नंबर दोन येथील त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानातूनच प्रज्ञाचक्षू गुलाबबाबा यांच्या प्रेरणेने साई मंदिर उभारण्याच्या भूमिकेला बळ मिळाले. त्याअनुषंगाने श्री साई सेवा मंडळाची स्थापना करून विजय कोंड्रा व अन्य सहकार्यांच्या मदतीने निधी गोळा केला व वर्धा महामार्गावर मंदिरासाठी जागा खरेदी केली

१९७६ मध्ये भूमीपुजन होऊन मंदिर उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि ३ डिसेंबर १९७९ रोजी मंदिरात श्रीसाईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. साईमंदिर उभारणीसोबतच सांस्कृतिक क्षेत्राकडेही त्यांची ओढ होती. त्यांनी शहरात दिग्गज संगीतकारांना निमंत्रित करून अनेक संगीत मैफिलींचे आयोजन केले होते. त्यांच्या स्वरसाधना संस्थेतर्फे त्यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. भीमसेन जोशाी, पं. जसराज उस्ताद, झाकीर हुसैन, उस्ताद अल्लारखाँ, पं. जगदीशप्रसाद, पं. अजय पोहनकर, बेगम परवीन सुल्ताना या साऱ्या कलावंतांच्या मैफिली प्रथमच नागपुरात आयोजित झाल्या होत्या.

शिवाय, बाबासाहेबांची काँग्रेस पक्षाची घनिष्टता होती. टी.जी. देशमुख, माजी मंत्री वसंतराव साठे यांचे मित्रत्त्वाचे संबंध होते. त्यांनी निवडणूकी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना मदत केली मात्र राजकारणापासून त्यांनी कायम फारकत घेतली, हे विशेष. त्यांनी सदैव संगीत क्षेत्रासाठी धडपड केली