नागालॅंड पोलिसांतर्फे महामानवला मानवंदना
बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात समाजातील प्रत्येक स्तरावरील अन्यायग्रस्त लोकांसाठी लढा दिला, त्यांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गांची निर्मिती करून समतेवर आधारित समाज निर्मितीची प्रेरणा आपल्या विचारातून मांडली. म्हणून बाबासाहेब हे प्रत्येेक स्तरातील अन्यायग्रस्तांचा हित जोपासणारे महापुरुष असल्याचे प्रतिपादन नागालॅंड पोलिस विभागाचे अतिरिक्त महासंचालक संदीप मधुकर तामगाडगे IPS यांनी केले. विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंतीनिमित्त नागालॅंड पोलिस विभागातर्फे कोहीमा पोलिस मुख्यालया तील प्रशासकीय भवनातील काॅन्फरन्स हाॅलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी नागालॅंड पोलिस विभागाचे महासंचालक टी. जाॅन लाॅंगकुमर IPS तर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक अमित निगम यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पहिल्यांदाच नागालँड राज्यात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात महासंचालक टी. जाॅन लाॅंगकुमर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
पुढे बोलताना संदीप तामगाडगे म्हणाले की, समता, स्वातंत्र्यात आणि बंधुता जिथे एकत्र नांदतात तिथे सामाजिक लोकशाही असते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमानंतर समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारित संविधानाची निर्मिती केली. बाबासाहेबांनी भारतीय नागरिकांना हक्क आणि अधिकार बहाल केले. ज्याच्यामुळे स्वतःची आणि समाजाची प्रगती करण्याचे स्वातंत्र्य भारतीयांना मिळाले आहे. ह्या हक्कांचा आणि अधिकारांचा वापर करताना नागरिकांनी सामाजिक स्वास्थ्य कायम राहील याचे भान राखणे गरजेचे आहे.
आज कित्येक दशकानंतरही बाबासाहेबांचे विचार भारतातीलच नव्हे तर जगभरातील भरकटलेल्या समाजाला दिशा देत असल्याचेही संदीप तामगाडगे म्हणाले. यावेळी अमित निगम यांनी बाबासाहेबांच्या स्मृतींचा उजाळा देताना ते म्हणाले की, आजच्या भारताच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान मोलाचे आहे. तर अध्यक्षीय भाषणात टी. जॉन लाँगकुमर म्हणाले की, भारताच्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या चारित्र्याचे आत्मपरीक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला. समतावादी समाजाची संकल्पना आणि भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेली प्रबुद्ध सभ्यता ही डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे असल्याचेही मत टी. जॉन लाँगकुमर यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या उदात्त आदर्शांना पुनरुज्जीवित करण्यासाठी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रस्तावनेचे वाचन केले.
प्रसिद्धी प्रमुख
अमोल कांबळे
8208353222