मुंबई : आजचा दिवस भारताच्या अंतराळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे, कारण भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अॅक्सिओम स्पेस यांच्या Axiom-4 (Ax-4) मोहिमेअंतर्गत अंतराळात झेप घेतली आहे. या मोहिमेने भारताला नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, कारण शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
ही मोहीम अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षिप्त केली गेली. यासाठी शुभांशू शुक्ला आणि त्यांची टीम स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने अवकाशात उड्डाण केले. या मोहिमेचा प्राथमिक निर्धार २९ मे रोजी केला गेला होता, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचा उड्डाण दिवस पुढे ढकलला गेला. अखेर २५ जून रोजी या मोहिमेने अवकाशात झेप घेतली.
भारतासाठी महत्त्वपूर्ण मोहीम
Axiom-4 मोहीम भारतासाठी एक ऐतिहासिक पर्व आहे. राकेश शर्मा यांच्या अंतराळातील ऐतिहासिक कार्यानंतर, शुभांशू शुक्ला हे अवकाश मोहिमेचे प्रतिनिधीत्व करणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. ही मोहीम भारताच्या वाढत्या अंतराळ क्षेत्रातील सामर्थ्य आणि जागतिक सहकार्याचे प्रतीक आहे.
शुभांशू शुक्ला या मोहिमेत पायलट म्हणून कार्य करत आहेत, आणि त्यांच्या सहकार्याने अवकाशात विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग केले जाणार आहेत.
१४ दिवसांचा अवकाश प्रवास-
या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह तीन अन्य आंतरराष्ट्रीय अंतराळवीर सहभागी झाले आहेत. यामध्ये नासाचे अंतराळवीर प्रमुख पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की, आणि हंगेरीचे तिबोर काबू यांचा समावेश आहे. चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहून विविध प्रयोग करतील.
या मोहिमेदरम्यान, शुभांशू शुक्ला भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे सादरीकरण करणार आहेत. यामुळे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा अवकाशातील आणखी एक नवा आयाम खुला होईल.