Published On : Wed, Nov 6th, 2019

कर संग्राहकांना एका ‘क्लिक’वर मिळणार मालमत्ता कराची माहिती

मनपाने तयार केले ॲप्लिकेशन : देशातील पहिली महानगरपालिका

नागपूर : नागपूर महानगरपालिकेत कार्यरत कर संग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर संग्राहकांना आता त्यांच्या परिसरातील करदात्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, असे ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यामुळे फाईलचा गठ्ठा घेऊन फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भार हलका होणार आहे. नव्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ॲन्ड्रॉईड मोबाईल फोनवर कर्मचाऱ्यांना संपूर्ण डाटा उपलब्ध राहील. अशा प्रकारचे ॲप्लिकेशन तयार करणारी नागपूर महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

कर विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम याबाबत माहिती देताना म्हणाले, सदर मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव ‘टॅक्स मॉनिटरींग सिस्टीम’ असे आहे. हे ॲप्लिकेशन मार्स टेलिकॉम लिमिटेड कंपनीने तयार केले आहे. हे एक जीआयस बेस्ड्‌ ॲप्लिकेशन असून त्यावर लॉग-इन करताच मालमत्ता धारकांकडे मालमत्तेचा किती कर आणि किती वर्षांपासून शिल्लक आहे, मालमत्तेचा सध्याचा उपयोग काय आहे, आदीबाबत माहिती उपलब्ध राहील. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बहुमजली इमारतीची माहितीही तात्काळ उपलब्ध होऊ शकेल. कर्मचारी जसे लॉग-इन करेल, त्याची माहिती मालमत्ता कर विभागाला प्राप्त होईल.

सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम पुढे म्हणाले, जर कुठल्या मालमत्तेचा कर बकाया असेल तर त्याची माहिती लाल रंगात दिसेल. ज्या मालमत्तेचा संपत्ती कर अदा झाला असेल ती माहिती हिरव्या रंगात दिसेल. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मालमत्तेशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर प्राप्त होईल. कर निर्धारण झाले नसलेल्या मालमत्तेची माहितीही यामध्ये उपलब्ध असेल. निवासी, गैरनिवासी, व्यावसायिक संपत्ती वेगवेगळ्या रंगात दिसेल. कर विभागातील कर्मचाऱ्यांना यूजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे.

नागपूर शहरात ६.५० लाख मालमत्ता आहेत, ज्यापैकी ५.७८ लाख मालमत्तेची माहिती ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करण्यात आली आहे. उर्वरीत मालमत्तांची माहिती अपलोड करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. यामाध्यमातून संपूर्ण वॉर्डात किती मालमत्ता धारकांकडे किती बकाया आहे, याचीही माहिती ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्राप्त होईल. उल्लेखनीय असे की, मालमत्ता कर विभागाने संपूर्ण शहराला ७७ वॉर्डामध्ये विभाजित केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर विभागाच्या कार्याला गती प्राप्त होईल आणि वसुलीत मदत होईल, अशी माहिती सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.