Published On : Fri, Jun 18th, 2021

अल्पसंख्याक समाजात कोव्हिड लसीकरणाबाबत जनजागृती

नागपूर: अल्पसंख्यांक समाजामध्ये कोव्हिड-१९ लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि लसीकरणासाठी उद्युक्त करण्याच्या दृष्टीने नुकताच नागपूर महानगरपालिका आणि सेंटर फॉर सोशल रिसर्च ॲण्ड एम्पॉवरमेंटच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्रात लसीकरण जनजागृती कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय वक्ते मौलाना हजरत आलमगीर अशरफ साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते. याप्रसंगी मौलाना हजरत आलमगीर अशरफ साहेब यांनी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या समज-गैरसमजावर प्रकाश टाकला. सोशल मीडियाच्या माध्यमातून लसीकरणाबाबत पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि कोव्हिडला हद्दपार करण्यासाठी, दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी लसीकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद यांनी यावेळी लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या मनात असलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कोरोना महामारीसंदर्भात माहिती देत लसीकरणाची आवश्यकता व्यक्त केली. कोरोना काळात काही मुस्लीम स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींनी मोलाचे कार्य केले आहे, असे सांगत त्यांनी विशेषत: जमाते इस्लामी, आसरा आणि प्यारे खान यांनी दिलेल्या सेवेचा आवर्जून उल्लेख केला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण ही काळाची गरज असून प्रत्येकाने लसीकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सेवानिवृत्त उपायुक्त अब्दुल रऊफ शेख यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि पाहुण्यांची ओळख करवून दिली.

कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहायक महाव्यवस्थापक वाहीद शेख, आफताब खान, इंजिनिअर हमीद कुरेशी, सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मुश्ताक कुरेशी, वेकोलिचे माजी महाव्यवस्थापक गुलाम कादीर, ॲड. कुतुब जाफर, अशरफ अली, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. आतिक खान, एएमओ डॉ. मोहम्मद साजिद, आशीनगर झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांच्यासह सेंटर फॉर सोशल रिसर्च ॲण्ड एम्पॉवरमेंटचे सदस्य, मशिदीतील इमाम, मुस्लीम विद्यार्थी व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.