Published On : Tue, Mar 31st, 2020

जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर आळा घालावा – विधानसभा अध्यक्ष

· भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे सूक्ष्म नियोजन करा

· वैद्यकीय साहित्य स्थानिक स्तरावर खरेदी करावे

· गावनिहाय नियोजन आराखडा बनवावा

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करतानांच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. यानिमित्ताने भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे सूक्ष्म नियोजन आवश्यक असून सर्वसामान्य कष्टकरी माणसाला या नियोजनात प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, ॲड. आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘लॉक डाऊन’च्या काळात लोकांना रोजगार नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील समस्या वेगवेगळ्या असून ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शहरावर अवलंबून आहे. दुध व भाजीपाला या जीवनाश्यक वस्तूंची विक्री कमी झाली आहे. अशावेळी नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी प्रशासनाने घरपोच अन्नधान्य पोहचवण्याची व्यवस्था करावी अशा सूचना श्री. पटोले यांनी केल्या. सामान्य दुकानदार, रिक्षाचालक, पानठेलाधारक यांचा या वितरण व्यवस्थेत प्रामुख्याने समावेश असावा असे ते म्हणाले.


येणाऱ्या काळात वैद्यकीय सेवेवर ताण निर्माण होणार असून शासकीय व्यवस्थेसोबतच खाजगी डॉक्टर व परिचारिकांच्या सेवा घेण्यात याव्यात असे ते म्हणाले. कोरोना हे नैसर्गिक संकट असून या संकटाचा आपण एकजुटीने सामना करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
कोरोना आपत्तीचे प्रशासन योग्य प्रकारे नियोजन करत असले तरी या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या व प्रश्नांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, बंदच्या काळात जीवनाश्यक वस्तूंची साठेबाजी होत असल्याचे तक्रारी प्राप्त होत आहे. साठेबाजावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी. असंघटीत कामगार व विस्थापित नागरिकांची व्यवसथा युध्द पातळीवर करण्यात यावी. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवोवे. शहरातील काही स्वयंसेवी संस्था गरजूंना अन्नदान करतात. अशा ठिकाणी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. कम्युनिटी किचनमध्ये निर्जंतूकीकरण आवश्यक असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. ज्या डॉक्टरांनी सध्या वैद्यकीय सेवा बंद केली आहे. अशा डॉक्टरांना नियमित सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले.

नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात तसेच दुध, भाजीपाला आदी सुविधा सुलभपणे कशा मिळतील यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. असेही यावेळी त्यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार
संचारबंदीमुळे जिवनाश्यक वस्तूसह इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होणार नाही. तसेच किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी अनावश्यक साठेबाजी करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या सुचना बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केल्यात

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाची सुलभपणे विक्री करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी सेवा केंद्र सुरू राहिल्यास नियोजन करणे सोयीचे होईल. स्थानिक तसेच परराज्यातील कामगारांना शासनाच्या निर्णयानुसार आहे तेथेच निवारा तसेच भोजनाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन करणे आवश्यक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कोरोना संदर्भात नागपूरसह विभागात आरोग्य विषयक राबविण्यात येत असलेल्या विविध उपायोजनांची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुमार 800 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच अतिजोखीम असलेल्या नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात 1 हजार खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून 7 हजार लोकांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर, वधा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली येथे अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ए. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर आयुक्त अभिजीत बांगर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, ‘मेयो’चे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, ‘मेडीकल’चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी यावेळी विविध उपाययोजनांची माहिती दिली.