– राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन केले. या आत्मचरित्राच्या पुनरप्रकाशनामध्ये पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्यापर्यंत अनेक वादग्रस्त बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदींसोबत पवारांचे संबंध कसे होते यावरही या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. पवारांच्या आत्मचरित्रामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ हा माझ्यासाठी मोठा धक्का असल्याचे शरद पवार यांनी पुस्कात लिहिले आहे. त्यादरम्यान काय घडामोडी घडल्या यावरही पवारांनी प्रकाश टाकला.
अजित पवारांची समजूत काढण्यात पत्नीचा मोलाचा वाटा :
विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. महाविकास आघाडी एकत्रित येत सरकार स्थापन करणार असतानाच २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन आला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोहाचलेले असून, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे पत्र सादर केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती मला देण्यात आली. त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली, असे पवार म्हणाले.
अजित पवारांचा विषय हा पारिवारिक होता. माझी पत्नी प्रतिभा आणि अजित यांच्यात घनिष्ठ संबंध होते. प्रतिभा कधी राजकीय घटनाक्रमात पडत नाही मात्र अजितची समजूत काढण्यात तिचा मोलाचा वाट असल्याचे पवार म्हणाले. अजितने प्रतिभाची भेट घेतल्यानंतर आपल्या मनातील दुःख तिला सांगितल्याचे पवार म्हणाले. त्याला आपली चूक कळली आणि सर्व काही ठीक झाले, असे पवार आपल्या पुस्तकात म्हणाले.
पंतप्रधान मोदींशी मैत्रीबद्दल खुलासा :
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्रीबद्दल देखील आपल्या आत्मचरित्रात खुलासा केला आहे. २००२ साली झालेल्या गुजरात दंगली नंतर नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीयस्तरावरील प्रतिमा ढासळली होती. विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली होती. गुजरातचे मुख्यमंत्री घटनात्मक प्रमुख असूनही काँग्रेस नेतृत्वाबरोबर त्यांच्या तापलेल्या संबंधांमुळे केंद्र आणि गुजरात सरकार यांच्यातला संवाद बंद झाला होता. काँग्रेसच्या मंत्र्यांना मोदी सोबत संबध ठेवण्यात रस नव्हता. काँग्रेसचे नेते यांच्यातल्या दुराव्याचा फटका गुजरातमधल्या जनतेला बसत होता. हे मला मान्य नव्हते. ही माझी प्रामाणिक धारणा होती. याविषयी मी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी बोललो आणि माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली असल्याचे पवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी संघर्ष न करता दिला राजीनामा:
उद्धव ठाकरे यांनी कोणताही संघर्ष न करता राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली, असे पवार आपल्या आत्मचरित्रात म्हणाले. द्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेत बंडखोरी होईल, त्यानंतर शिवसेना नेतृत्व गमावेल, याची आम्हाला कल्पना नव्हती. उद्धव यांनी न लढता राजीनामा दिला, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, असे पवार म्हणाले.