Published On : Mon, Mar 20th, 2017

डॉक्टरांवरील हल्ले सुरूच, औरंगाबाद घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

Advertisement

Ghati-Hospital
औरंगाबाद:
धुळे आणि मुंबईत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना ताज्या असतानाच आता औरंगाबादमध्येही अशी घटना घडली आहे. औरंगाबादेतील घाटी या शासकीय रूग्णालयातील डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली आहे. डॉक्टरांवरील या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऎरणीवर आला आहे.

घाटीतील निवासी डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ रूग्णालयासमोर शांततेत आंदोलन केलं. रात्री उशिरा एका रूग्णाचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टर विवेक बडगे यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर विवेक यांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

दरम्यान, मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सामूहिक काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

धुळ्यापाठोपाठ मुंबईत डॉक्टरांवर हात उचलल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सायन हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. या घटनेच्या विरोधात निवासी डॉक्टर रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सामूहिक रजेवर गेले आहेत. तसेच नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलमधील रुटीन सेवा बंद करण्यात आल्या आहेत, तर अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सायन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.