Published On : Fri, Sep 13th, 2019

सावधान!…चिमुकल्यांचा जीव गुदमरतोय

Advertisement

क्षमताबाह्य वाहतुकीने विद्यार्थी असुरक्षित, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन

नागपूर शाळा सुरु होऊन जवळपास दोन महिन्या चा कालावधी लोटला तरी शाळेतीळ एकूण पटसंख्येच्या आधारावर संबधित मार्गावरील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळेतील चिमुकल्यांना सोडण्यासाठी बसची व्यवस्था शाळा प्रशासनाने करावी अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरू लागली आहे. कारण अनेक शाळेच्या बसमध्ये क्षमताबाह्य विध्यार्थी बसलेले जात असल्याने चिमुकल्यांचा जीव गुदरमत असल्याचे चित्र सध्या बुटी बोरी व तालुक्यात सर्रासपने बघायला मिळत आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून दप्तराचे मोडकळीस आलेली पाठ घेऊन चालताना जणू काही बालवयातच विध्यार्थ्यांना पाठीला पोक आल्याची स्थिती आहे. प्रत्येक चिमुकला उत्साहाने ‘स्कुल चाले हम’ असे असताना मात्र शाळेत जाण्यासाठी पालकांनी निवडलेली चिमूकल्यांची वाहतूक कितपत सुरक्षित आहे, याची चिंता नसल्याचे दिसते.ज्या वाहनांमध्ये शाळेला जाणारी मुले प्रवास करीत आहेत त्यात क्षमताबाह्य विद्यार्थी कोंबले जातात. मात्र, याकडे वाहतूक विभाग हा धृतराष्ट्राची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या प्रकाराकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, पालकही बेफिकीर असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बुटीबोरी शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या वर आहे.

घरापासून शाळेचे अंतर दूर असल्याने मुलांसाठी वाहनाने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पोलीस प्रशासनाच्या नजरेआड सकाळी आणि मुलांना सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेली वाहने वेगाने धावतात. शहरातील मोठ्या रस्त्यांवरील शाळांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने देखील सूचना द्याव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळा सुटण्यापूर्वी वाहनचालक शाळेच्या बाहेर येऊन थांबतात. यामुळे विद्यार्थी वाहनात बसण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतात. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. शाळाचालकांनी रिक्षांना शाळेच्या मैदानात र्पाकिंगसाठी सोय करावी असी मागणी आहे.

शहर व परिसरातील सुमारे १५ पेक्षा अधिक प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे.नियमानुसार विद्यार्थी वाहतूक केल्यास आर्थिक गणित जुळत नसल्याचा दावा केला जातो. एका फेरीत व्हॅनमध्ये क्षमताबाह्य विद्यार्थ्यांची एका वेळी वाहतूक केली जाते. शाळेपासून घराच्या अंतरापर्यंत आकारण्यात येणारे भाडे जास्तीत जास्त गोळा व्हावे म्हणून वाहतूक परवान्याच्या नियमांकडे वाहनचालक कानाडोळा करतात. मारूती व्हॅन सारख्या वाहनातून १५ ते २० विद्यार्थ्यांची खुराड्यासारखे कोंबुन वाहतूक केली जाते. या वाहनांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचे हात-पाय बाहेर निघालेले असतात.

चालकालाही बसायला पुरेशी जागा नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असतो. यापैकी बहुतांश वाहनचालकांकडे वाहतूक विभागाचा परवाना देखील नसल्याची चर्चा आहे. सुरक्षिततेचा विचार करून पालकांनी आपल्या पाल्याला स्कूलबसनेच प्रवास करता येईल, त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. मात्र, तसे न करता बहुतांश पालक हे विद्यार्थी वाहतूक करणार्‍या व्हॅनचा वापर करतात. व्हॅनचे दार मधोमध असते. त्यामुळे मुलांना गाडीत चढताना पाय उंच करावा लागतो.

त्यामुळे ते घसरून पडण्याचा धोका असतो. व्हॅनच्या दाराला लॉक लावलेले नसेल तर दार कधीही उघडू शकते. व्हॅनमध्ये घरगुती गॅसचा वापर होत असेल आणि निकृष्ट गॅस किट वापरले असेल तर ते जीवघेणेच ठरू शकते.हा विषय अतिशय गंभीर असून याकडे संबंधित विभाग लक्ष देईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संदीप बलविर
तालुका प्रतिनीधी