Published On : Thu, Jun 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

कामठीत पुन्हा बालविवाहाचा प्रयत्न उधळला; पोलिस आणि बाल संरक्षण पथकाची वेळीच कारवाई

Advertisement

कामठी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात बालविवाहाच्या घटना सातत्याने समोर येत असून, अशाच एका प्रकारात वेळीच हस्तक्षेप करत पोलिस आणि जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने आणखी एक बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडण्याच्या तयारीत असताना, कामठी नवीन पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश आंधळे यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्याशी संपर्क साधत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईसाठी पुढाकार घेतला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रंजीत कुरे यांच्या आदेशानंतर तातडीने एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. पोलीस आणि पथकाने संयुक्तपणे संबंधित ठिकाणी धडक कारवाई करत विवाह रोखला. त्यावेळी नवरी हळद लावून विवाहासाठी सज्ज होती.

मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून, तिची सुरक्षितता लक्षात घेता तिला बालगृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी तिच्या पालकांना कायदेशीर नोटीस देत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कामठी परिसरात मागील काही महिन्यांत बालविवाहाच्या तक्रारी वाढल्याचे स्पष्ट होत असून, प्रशासनाने आता या प्रकारांना आवर घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

यापुढे विवाह मंडळ, हॉल, डेकोरेशन, केटरिंग यांना नोटीस देऊन विवाह सोहळ्यांसाठी वधू-वरांची वयोमर्यादा निश्चित केल्याशिवाय कोणतीही सेवा देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात येणार आहेत.

बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान हाती घेण्यात येणार असून, महिला व बालविकास विभाग आणि पोलिस विभाग यामध्ये समन्वय साधून काम करणार आहेत.

या कारवाईत संरक्षण अधिकारी साधना हटवार, दीप्ती मोडघरे, रुक्मिणी जंगलवार तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वैष्णवी बावणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

बालविवाह रोखणे ही फक्त सरकारी एजन्सीजचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Advertisement
Advertisement