Published On : Thu, Nov 28th, 2019

धावत्या रेल्वेत टीसीवर हल्ला

संघमित्रा एक्स्प्रेसमधील घटना

नागपूर: धावत्या रेल्वेत एका तिकीट तपासणीस कर्मचाèयावर महिलांनी हल्ला केला. वेळीच तृतियपंथीयांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला. ही घटना संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये खापरी रेल्वे स्थानकाजवळ २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
उमेश सहारे (४५, रा. न्यु नंदनवन) हे मध्य रेल्वे नागपूर विभागात वरिष्ठ तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणे ते १२२९६ दाणापूर – बेंगळूरू संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर होते. ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकाहून सायंकाळी ६.१५ वाजता सुटली.

प्रवाशांकडून तिकीट तपासणी करीत असताना सहारे एस-४ डब्यात गेले. त्यांनी त्या डब्यातील महिलांनाही तिकीट विचारले. मात्र, त्या तीन महिलांनी तिकीट तर दाखविलीच नाही उलट वाद घातला. वाद वाढतच गेल्याने त्यांनी टीसीला पाहून घेण्याची धमकी दिली.

हा प्रकार धावत्या रेल्वेत घडला. पुढे गाडी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर थांबली असता ३ पुरूष तेथे आले. काही कळण्याआधीच महिला आणि पुरूषांनी सहारे यांच्यावर हल्ला चढविला. मात्र, वेळीच तृतियपंथी धावून गेले. त्यांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला.

विशेष म्हणजे तीन्ही महिला विना तिकीट प्रवास करीत होत्या. हा संपूर्ण प्रकार त्यांनी लोहमार्ग पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.