Published On : Thu, Nov 30th, 2017

डोंगरगाव नागपूर भागात गॅस कटरने एटीएम कापून लाखो रुपये लंपास

नागपूर: सदर एटीएम सेंटर हे बँक आॅफ इंडियाचे आहे. डोंगरगाव-गुमगाव रोडवर बँक आॅफ इंडियाची शाखा असून तेथून काही अंतरावरच सुरेश धुर्वे यांच्याकडे एका खोलीमध्ये एटीएम सेंटर आहे.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपी एटीएम सेंटरवर आला. लगेच त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून रेकॉर्डिंग बंद केले. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन तोडली. त्यातील लाखो रुपये काढून तो पसार झाला.

चोरीचा हा प्रकार बुधवारी सकाळी लक्षात आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी हिंगणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे, उपनिरीक्षक धानोरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख हे दाखल होऊन पंचनामा केला .

याबाबत एटीएम सेंटर चालविणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र वसाखेत्रे यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास हिंगणा पोलीस करीत आहे.