Published On : Thu, Jul 19th, 2018

कालबद्ध नियोजनातून मुंब्रा, दिवा भागातील पाणीप्रश्न मार्गी लावणार – डॉ.रणजित पाटील

Dr Ranjit Patil

नागपूर: कालबद्ध नियोजनातून मुंब्रा व दिवा भागातील पाणीप्रश्न मार्गी लावणार असून त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथील मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या भागातील पाणीटंचाईबाबत लक्षेवधी सूचना केली होती, त्याला उत्तर देताना डॉ.पाटील म्हणाले, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सध्याची लोकसंख्या सुमारे 23.5 लक्ष असून एकूण पाणीपुरवठा 485 द.ल.लि इतका आहे.

सेंट्रल पब्ल‍िक हेल्थ ॲण्ड एनव्हायरमेंट इंजिजिअरिंग ऑर्गनायझेशन यांनी महानगरपालिकांकरिता निश्चित केलेल्या मानांकनानुसार 150 लिटर प्रती माणसी प्रतिदिन पाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे सुमारे 204 लिटर प्रती माणसे प्रती दिन पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

तसेच सद्य:स्थितीत पाण्याचे वहन व साठवण करण्याकरिता मुंब्रा व दिवा विभागात एकूण 10 जलकुंभ व 2 पंप हाऊस कार्यान्वित आहेत. या दोन प्रभागात ठाणे महानगपालिकेमार्फत उपलब्ध 101.50 द.ल.लि.पाण्याव्यतिरिक्त इतर वापराच्या पाण्याकरिता 88 विहिरी व 72 ट्यूबवेल उपलब्ध आहेत.

उक्त दोन प्रभागांमध्ये अतिरिक्त वहन व साठवण क्षमता वाढविण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने रिमॉडलिंग प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार उक्त दोन प्रभागांची विभागणी 23 वॉटर डिस्ट्रीक्ट मध्ये करण्याचे प्रस्तावित आहे.

या प्रकल्पासाठी 192 कोटी खर्च अपेक्षित असून तो महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यास सांगण्यात आले आहे, त्यानंतर याबाबत कालबद्ध नियोजन करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता होऊ नये यासाठी आयुक्तांना सूचना दिल्या जातील. पाणी चोरी व अधिकृत पाणी जोडणी याबाबत अधिवेशन संपताच लक्ष देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय केळकर, सुभाष भोईर यांनी सहभाग घेतला.