नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत 21 डिसेंबर 2021 रोजी नियमबाह्य तात्पुरत्या (तदर्थ) केंद्र प्रमुख पदोन्नती व 30 जून 2023 रोजी करण्यात आलेल्या नियमितिकरणाच्या चौकशीसंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या नागपूर जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर काळे यांनी आमदार संदीप जोशी यांना निवेदन दिल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या दालनात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार संदीप जोशी, शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर काळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सदर प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार संदीप जोशी यांनी विषयाचे गांभीर्य अधोरेखित करत तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले. शिक्षक महासंघाने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
या प्रकरणात नियमबाह्य नियुक्त्या झाल्याचा आरोप शिक्षक संघटनेकडून सातत्याने करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे पात्र शिक्षकांचे नुकसान झाले असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे या विषयात पारदर्शक चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी संघटनेची भूमिका आहे.
शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर काळे यांनी आमदार संदीप जोशी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट उल्लेख केला आहे की, सदर नियुक्त्यांमुळे अनेक पात्र शिक्षकांना अन्याय सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौकशी प्रक्रियेला विलंब होणे, शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण करत आहे.
विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महामुनी यांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास करून तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
एसआयटी चौकशी?
नियमबाह्य तात्पुरत्या केंद्र प्रमुख पदोन्नती आणि नियमितीकरण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आमदार संदीप जोशी यांनी सांगितले.